आरपीआयच्या स्वतंत्र गटाची मागणी फेटाळली

By Admin | Updated: March 11, 2017 03:40 IST2017-03-11T03:40:31+5:302017-03-11T03:40:31+5:30

महापालिका निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेल्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या (आठवले गट) ५ नगरसेकांची स्वतंत्र गट म्हणून नोंदणी करण्याचा केलेला

The demand for separate group of RPI has been rejected | आरपीआयच्या स्वतंत्र गटाची मागणी फेटाळली

आरपीआयच्या स्वतंत्र गटाची मागणी फेटाळली

पुणे : महापालिका निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेल्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या (आठवले गट) ५ नगरसेकांची स्वतंत्र गट म्हणून नोंदणी करण्याचा केलेला अर्ज विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी शुक्रवारी फेटाळून लावला. त्यामुळे भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेल्या रिपाइंच्या कार्यकर्त्यांना भाजपाचेच नगरसेवक म्हणून राहावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपा व रिपाइंमध्ये निवडणूकपूर्व युती झाली होती. त्यानंतर निवडणूक लढविताना रिपाइंच्या १० उमेदवारांनी रीतसर भाजपाचे उमेदवार म्हणून त्याचे कमळ हे चिन्ह घेऊन निवडणूक लढविली. त्यांपैकी ५ जण नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यानंतर त्यांनी रिपाइंचा स्वतंत्र गट म्हणून नोंदणी करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे अर्ज केला होता. त्याचबरोबर त्यांनी डॉ. सिद्धार्थ धेंडे यांना गटनेते म्हणून निवडले होते.
एस. चोक्कलिंगम यांनी याबाबत सांगितले, ‘‘रिपाइं उमेदवारांनी निवडणूक लढविताना भाजपाचे उमेदवार असे नमूद केले आहे; त्याचबरोबर शासनाने प्रसिद्ध केलेल्या गॅझेटमध्येही त्यांची नोंद भाजपाकडून निवडून आलेले नगरसेवक अशीच झाली आहे. त्यामुळे स्वतंत्र गट म्हणून रिपाइंला मान्यता देता येणार नाही. याबाबत त्यांना कळविण्यात आले.’’
सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले, ‘‘विभागीय आयुक्तांनी स्वतंत्र गट म्हणून नोंदणी करण्याची मागणी फेटाळल्याच्या विरोधात न्यायालयात जाणार आहोत. विभागीय आयुक्तांकडे जरी आमची अधिकृत नोंदणी करता आली नसली, तरी महापालिकेत आम्हाला स्वतंत्र गट म्हणून राहायला कोणतीही अडचण येणार नाही.’’ रिपाइंच्या १० उमेदवारांनी भाजपाचे कमळ चिन्ह घेऊन निवडणूक लढविल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. पक्षाची शहर कार्यकारिणीही बरखास्त करण्यात आली होती. भाजपाचे ९८ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांमध्ये रिपाइंचे ५ व भाजप पुरस्कृत अपक्ष नगरसेविका रेश्मा भोसले यांचा समावेश आहे.

Web Title: The demand for separate group of RPI has been rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.