‘सनातन’ कादंबरीला प्रादेशिक भाषांसह इंग्रजीत मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:11 IST2021-04-11T04:11:47+5:302021-04-11T04:11:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लेखक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या ‘सनातन’ कादंबरीला साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित‘सरस्वती सन्मान’ जाहीर झाल्यानंतर या ...

‘सनातन’ कादंबरीला प्रादेशिक भाषांसह इंग्रजीत मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लेखक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या ‘सनातन’ कादंबरीला साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित‘सरस्वती सन्मान’ जाहीर झाल्यानंतर या कादंबरीला प्रादेशिक भाषांसह इंग्रजी अनुवादासाठी मागणी वाढली असून, आठच दिवसांत कादंबरीच्या भाषंतराचे हक्क विकले गेले आहेत. लवकरच ही कादंबरी उडिया, कन्नड, पंजाबी, मल्याळम या चार भाषांमधील वाचकांच्या हाती पडणार आहे. दरम्यान, बंगाली आणि इंग्रजी भाषेतील अनुवादासाठी प्रक्रियादेखील सुरू झाली आहे.
दिल्ली येथील के. के. बिर्ला फाउंडेशनच्या वतीने डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या ‘सनातन’ कादंबरीला ‘सरस्वती सन्मान’ जाहीर झाला आहे. हा सन्मान मिळवणारे डॉ. लिंबाळे हे तिसरे मराठी लेखक ठरले आहेत. भीमा कोरेगाव लढ्याला दोनशे वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर ‘सनातन’ कादंबरीच्या लेखनाची बीजे रूजली गेली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी दलित-आदिवासींनी मोठ्या प्रमाणावर संघर्ष केला. परंतु स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात त्यांच्या योगदानाचा गौरव झाला नाही. त्यामुळे ‘सनातन’मधून नवा इतिहास उभा केला आहे. दलिताच्या संघर्षाचा गौरवशाली इतिहास सांगणारी ही कादंबरी आहे. इतकी महत्त्वपूर्ण कादंबरी असूनही तिची साहित्यविश्वात म्हणावी तितकी दखल घेतली गेली नव्हती. मात्र या कादंबरीला सरस्वती सन्मान जाहीर झाल्यानंतर ही कादंबरी ख-या अर्थाने प्रकाशझोतात आली. या कादंबरीच्या प्रादेशिक भाषांसह इंग्रजी भाषेमध्ये अनुवाद करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विचारणा सुरू झाली. त्यानुसार कादंबरीच्या भाषांतरासंबंधीचे करार झाले असल्याची माहिती डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी दिली. ते म्हणाले, ‘सनातन’ ही कादंबरी आजमितीला केवळ हिंदी भाषेमध्येच अनुवादित झाली आहे. कन्नड भाषेमध्ये हे पुस्तक प्रकाशित होणार होते. मात्र बंगळुरूच्या नवकन्नड प्रकाशन संस्थेने ‘सनातन’ या नावावरून आक्षेप घेत ते छापण्यास नकार दिला होता. सनातन म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोळकर, कलबुर्गी यांच्याशी संबंधित आहे की काय असे त्यांना वाटले. याचबरोबर कन्नड-मराठी वाद सर्वश्रृतच आहे. या भीतीपोटी कन्नड प्रकाशक हे पुस्तक छापण्यास तयार नव्हते. पण सन्मान जाहीर झाल्याचे कळताच त्या कन्नड प्रकाशकाने दोनच महिन्यांत कादंबरी कन्नड भाषेत प्रकाशित होईल, असे सांगितले. आजमितीला माझी 53 पुस्तके विविध भाषांंमध्ये अनुवादित झाली आहेत तर तीन भाषांतरित पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. सोशल मीडियामुळे पुस्तकाच्या अनुवादाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.