जिल्ह्यातील दुबार मतदारांची नावे होणार डिलिट
By Admin | Updated: April 24, 2015 03:28 IST2015-04-24T03:28:44+5:302015-04-24T03:28:44+5:30
जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने वेळोवेळी नोटीस देऊन देखील लाखो मतदारांनी आपले दुबार नाव, मयत झालेल्या व्यक्तींचे नाव कमी करण्यासाठी अर्ज केले नाहीत

जिल्ह्यातील दुबार मतदारांची नावे होणार डिलिट
पुणे: जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने वेळोवेळी नोटीस देऊन देखील लाखो मतदारांनी आपले दुबार नाव, मयत झालेल्या व्यक्तींचे नाव कमी करण्यासाठी अर्ज केले नाहीत. यामुळे दुबार मतदारांवर कडक कारवाई करून अशी नावे त्वरित डिलिट करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ४ लाख ८६ हजार दुबार मतदारांची नावे यादीतून लवकरच डिलिट करण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिवडणुक निर्णय अधिकारी समिक्षा चंद्राकार यांनी सांगितले.
जिल्हा निवडणूक कार्यालयांच्या वतीने जिल्ह्यातील मयत, दुबार आणि स्थलांतरित मतदारांची स्वतंत्र यादी तयार केली आहे.
अशा मतदारांची यादी सर्व विधानसभा मतदार संघात संबंधित मतदार नोंदणी अधिका-यांच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मतदार यादीत दोन ठिकाणी नाव असलेल्या मतदारांना नोटीसा पाठवून त्यांना नक्की कोणत्या मतदार संघात नाव कायम ठेवायचे याची विचारणा केली आहे. एकाच व्यक्तींचे दोन मतदार संघात नाव असणे कायद्याने गुन्हा आहे, त्यामुळे या नोटीसीला उत्तर न देणा-या मतदारांवर कारवाई करुन त्यांची नावे अखेर डिलिट करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात २१ विधानसभा मतदार संघात ८ हजार ९४७ मतदार स्थलांतरीत, १२ हजार ८४५ मतदार मयत आणि तब्बल ४ लाख ६४ हजार २३८ मतदार दुबार आहेत. या मतदारांमुळे जिल्ह्याची मतदार यादी मोठ्या प्रमाणात फुगली आहे. त्यामुळे ही नावे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)