बंडखोरांमुळे उमेदवारीस विलंब
By Admin | Updated: January 30, 2017 02:56 IST2017-01-30T02:56:54+5:302017-01-30T02:56:54+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी जवळपास सर्वच महत्त्वाच्या राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

बंडखोरांमुळे उमेदवारीस विलंब
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी जवळपास सर्वच महत्त्वाच्या राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यानंतर बहुतेक उमेदवार निश्चितही झाले आहेत. मात्र, यादीची प्रतीक्षा सर्वाना आहे. बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्षांनी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीपर्यंत उमेदवारी जाहीर होणार नसल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार आहे. चार सदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार आहे. पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा इच्छुकांना आहे. पहिल्या टप्प्यात गाठीभेटी घेत आहेत. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वीच शिवसेनेसह राष्ट्रवादी, भाजपा आणि काँगेस या प्रमुख राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. सध्या सर्वच पक्षांमध्ये युती फिस्कटली आहे. मात्र, आघाडीसंदर्भात बैठका सुरूच आहे.
उमेदवारी आपल्याला नाही मिळाली तरी निदान पत्नीला तरी मिळावी, यासाठी इच्छुकांची धडपड सुरू आहे. काही ठिकाणी एकाच जागेवरील उमेदवारीसाठी चार-पाच जणांमध्ये तीव्र रस्सीखेच आहे. स्थानिक पातळीवर नेत्यांनी आपापले उमेदवार निश्चित केले आहेत. पक्षश्रेष्ठीकडे यादीही पाठविली आहे. मात्र, आताच उमेदवारी जाहीर केली तर पक्षाअंतर्गत बंडखोरी होऊ नये, याची दक्षता सर्वच राजकीय पक्षांनी आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून सुरू झाली आहे. उमेदवाराचे नाव जाहीर केले, तर उमेदवारी न मिळालेले असंतुष्ट अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करून अन्य पक्षाकडून अथवा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)