स्वाइन फ्लूच्या औषधांचा महापालिकेकडे तुटवडा
By Admin | Updated: February 23, 2015 00:19 IST2015-02-23T00:19:23+5:302015-02-23T00:19:23+5:30
शहरामध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, महापालिकेसह राज्य शासनाकडे औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

स्वाइन फ्लूच्या औषधांचा महापालिकेकडे तुटवडा
पिंपरी : शहरामध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, महापालिकेसह राज्य शासनाकडे औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. सन २००९ मध्ये या आजाराची तीव्रता वाढून अनेकांचे बळी गेले. यंदा फ्लूची साथ येऊन दीड महिन्यापेक्षा अधिक काळ उलटूनही औषध न मिळाल्याने अनेकांचे बळी जात आहेत. आतापर्यंत ७ जणांचे प्राण गेले आहेत. महापालिकेने त्वरित दक्षता घेऊन पुरेशा प्रमाणात औषधे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
महापालिकेकडे सध्या टॅमिफ्लू गोळ्यांचा मर्यादित साठा आहे. ७५ मिलीच्या ५ हजार ५००, ४५ मिलीच्या १ हजार, तर ३० मिलीच्या ८०० गोळ्या आहेत. सिरपची एकही बाटली पालिकेकडे उपलब्ध नाही. औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. दुसरीकडे रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे महापालिकेचा वैद्यकीय विभागच चिंतेत आहे. यावर उपाययोजना म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने औषधाच्या ३ हजार बाटल्या खरेदीचा प्रस्ताव
आयुक्तांकडे पाठवला होता. तातडीने औषधे उपलब्ध करण्यासाठी तो प्रस्ताव मान्य करून चार दिवसांपूर्वी महापालिकेने राज्य शासनाकडे पाठविला. मात्र, राज्यभरातच
तुटवडा असल्यामुळे ही औषधे उपलब्ध झाली नाहीत.
औषधाअभावी रुग्णाचा जीव जाणार नाही, याची दक्षता म्हणून महापालिकेच्या वतीने ५ हजार गोळ्या खरेदी केल्या आहेत. त्या दोन दिवसांतच मिळाल्या आहेत. खासगी औषधविक्रेत्यांनाही स्वाइन फ्लूची औषधे ठेवण्यासाठी सांगितले असतानाही, ती केवळ दोन ते तीनच ठिकाणी उपलब्ध आहेत. (प्रतिनिधी)