सोहळ्यासाठी देहू, आळंदी सज्ज
By Admin | Updated: July 8, 2015 01:42 IST2015-07-08T01:42:53+5:302015-07-08T01:42:53+5:30
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३०व्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून दिंड्या देहूनगरीत दाखल झाल्या आहेत.

सोहळ्यासाठी देहू, आळंदी सज्ज
देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३०व्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून दिंड्या देहूनगरीत दाखल झाल्या आहेत. सोहळ्यासाठी ही नगरी सज्ज झाली आहे. बुधवारी अडीचला पालखीचे प्रस्थान होणार आहे. सोहळ्यासाठी मानाचे अश्वदेखील देहूत येऊन दाखल झाले आहेत.
देहूनगरीतील वातावरण टाळ-मृदंगाच्या गजराने आणि वीणेच्या झंकारासह हरिनामाच्या जयघोषाचा गजर करीत मुक्कामी विसावले आहेत. सालाबादप्रमाणे प्रत्येक दिंड्यांचे मुक्काम नियोजित जागी पडले असून, तेथे हरिनामसंकीर्तनात दंग झाले असल्याने देहूनगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास पालखीच्या पुढे चालणारे अकलूजच्या मोहिते-पाटील व बाभूळगावकर यांचे अश्व देहूनगरीत दाखल झाले असून, या अश्वांच्या दर्शनासाठी भाविकांनीदेखील गर्दी केली होती.
पालखी प्रस्थानपूर्व एक दिवस व अधिक मास यानिमित्त स्थानिक नागरिकांसह राज्यातील भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती.
मुख्य मंदिरात दर्शनासाठी काकडारती झाल्यापासून भाविकांनी दर्शनबारीतून रांगा लावल्या होत्या. या रांगा दुपारपर्यंत वाढत जाऊन पालखी मार्गावरील बाजारआळीपर्यंत पोहोचल्या होत्या.
दुपारनंतर या रांगा अधिकच वाढल्याने दर्शनासाठी अधिकच गर्दी झाली होती. (वार्ताहर)