ठाम भूमिका असलेला अर्थसंकल्प
By Admin | Updated: March 8, 2015 00:59 IST2015-03-08T00:59:49+5:302015-03-08T00:59:49+5:30
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेमध्ये नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात ठाम भूमिका मांडलेली दिसते. या अर्थसंकल्पाचे दूरगामी परिणाम काय होतील हे आगामी काळच ठरवेल,

ठाम भूमिका असलेला अर्थसंकल्प
पुणे : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेमध्ये नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात ठाम भूमिका मांडलेली दिसते. या अर्थसंकल्पाचे दूरगामी परिणाम काय होतील हे आगामी काळच ठरवेल, असे प्रतिपादन ‘नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिट’री (एनएसडीएल)चे उपाध्यक्ष चंद्रशेखर टिळक यांनी आज येथे केले.
दि कॉसमॉस को-आॅपरेटिव्ह बँक आणि गरवारे कॉलेज आॅफ कॉमर्स यांच्या तर्फे टिळक यांचे ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०१५-१६’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष मधुकर अत्रे, ‘नॅफकॅब’चे अध्यक्ष आणि कॉसमॉस बँकेचे ज्येष्ठ संचालक डॉ. मुकुंद अभ्यंकर, व्यवस्थापकीय संचालक विक्रांत पोंक्षे, गरवारे कॉलेज आॅफ कॉमर्सचे प्राचार्य एन. एस. उमराणी, कॉसमॉस बँक संचालक मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य उमराणी यांनी प्रास्ताविकात या व्याख्यानाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. विक्रांत पोंक्षे यांनी टिळक यांचा परिचय करून दिला. कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी टिळक यांचा सत्कार केला. उपप्राचार्य आनंद लेले यांनी आभार मानले. मिनोती दामले यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
‘अच्छे दिन’ मिळवावे लागतील
या अर्थसंकल्पाचे वर्णन पाच ‘पी’ मध्ये करता येईल. यामध्ये पेट्रोल, पोस्ट, पेन्शन, प्रायसिंग, पोझिशन आणि पेशन्स यांचा समावेश करायला हवा. अर्थमंत्र्यांनी मांडलेला अर्थसंकल्प ‘कॉर्पोरेट’धार्जिणा आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. मात्र, तशी परिस्थिती दिसत नाही. आगामी काळाचा विचार करून, एक ठाम विचार या अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. याचे नेमके परिणाम काय होतील- हे आगामी काळच ठरवेल. जेटली यांनी अर्थसंकल्पाद्वारे ‘फूल भी खिलाएँ और गुल भी खिलाएँ’ असे म्हणावे लागेल. मोदीसरकार ‘अच्छे दिन..’चा वादा करीत असले, तरी हे ‘अच्छे दिन’ बायपोस्ट आपल्यापर्यंत येणार नाहीत, तर ‘अच्छे दिन’ आपल्याला मिळवावे लागतील, असे टिळक म्हणाले.