साखर कारखान्यांच्या क्षेत्रात ऊस लागवडीत घट
By Admin | Updated: September 3, 2015 03:07 IST2015-09-03T03:07:29+5:302015-09-03T03:07:29+5:30
सलग तीन महिने पावसाने तोंडही न दाखवल्याने नीरा-भीमा खोऱ्यातील साखर कारखाना क्षेत्रातातील ऊस लागवडीत घट झाली आहे. श्री सोमेश्वर, छत्रपती, माळेगाव, नीरा-भीमा

साखर कारखान्यांच्या क्षेत्रात ऊस लागवडीत घट
रविकिरण सासवडे, बारामती
सलग तीन महिने पावसाने तोंडही न दाखवल्याने नीरा-भीमा खोऱ्यातील साखर कारखाना क्षेत्रातातील ऊस लागवडीत घट झाली आहे. श्री सोमेश्वर, छत्रपती, माळेगाव, नीरा-भीमा कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी उसाची लागवड केलेली नाही. या हंगामात उसाचे २५ टक्के क्षेत्र कमी होणार आहे, तर पुढच्या हंगामात अधिक घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सध्या २०१५-१६ च्या हंगामासाठी ऊस लागवडी जगवायच्या असतील तर वेळेत कालव्याचे आवर्तन मिळण्याची गरज आहे. परंतु, दुष्काळी परिस्थितीमुळे धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित झाल्यास उसाच्या लागवडी जळून जाण्याचाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आहे त्या पाण्याचा काटकसरीने वापर करून शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. त्यासाठी शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात ठिबकचे अनुदान जमा करावे, अशी मागणी कारखानाचालकांनी केली आहे.
मागील तीन महिन्यांपासून या भागात पाऊस पडला नसल्याने जिरायती भागाबरोबरच बागायती भागही चिंतेत आहे. तीनही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील अडसाली ऊस लागवडीचे क्षेत्र मागील वर्षीच्या तुलनेत घटले आहे. छत्रपती कारखाना क्षेत्रात १० हजार ८०० एकर क्षेत्रावर लागवड झाली आहे, तर मागील वर्षीच्या तुलनेत छत्रपतीचे १ हजार ४० एकराने क्षेत्र घटले आहे. माळेगावच्या ३१ सप्टेंबरपर्यंत केवळ ८ हजार ५२५ एकरावर लागवडी झाल्या आहेत. तसेच सोमेश्वर कारखान्याचेही १ हजार एकराने यंदाचे लागवड क्षेत्र घटले आहे. सध्या सोमेश्वर कारखान्याच्या १० हजार एकर क्षेत्रावर लागवडी झाल्या आहेत. लागवड क्षेत्र जरी घटले असले तरी सध्या नवीन केलेल्या लागवडी जगवायच्या कशा, असा प्रश्नही ऊस उत्पादकांपुढे उभा राहिला आहे. नीरा-भीमाचे कार्यकारी संचालक बी. बी. नवले यांनी सांगितले, या हंगामात टंचाईचा परिणाम होणार नसला तरी जवळपास २५ टक्के उसाची घट असेल.