हगणदरीमुक्तीचे मानपत्र!

By Admin | Updated: September 7, 2016 01:32 IST2016-09-07T01:32:28+5:302016-09-07T01:32:28+5:30

हगणदरीमुक्त जिल्हा ही मोहीम सध्या जिल्ह्यात जोरात सुरू असून, याला गती देण्यासाठी जो जिल्हा परिषद गट हगणदरीमुक्त होईल त्या सदस्याला मानपत्र दिले जाणार

Declaration of Handicrafts! | हगणदरीमुक्तीचे मानपत्र!

हगणदरीमुक्तीचे मानपत्र!

पुणे : हगणदरीमुक्त जिल्हा ही मोहीम सध्या जिल्ह्यात जोरात सुरू असून, याला गती देण्यासाठी जो जिल्हा परिषद गट हगणदरीमुक्त होईल त्या सदस्याला मानपत्र दिले जाणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पुढील आठवड्यात बुधवारी (दि.१४ सप्टेंबर) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत त्यांचा अभिनंदनाचा ठराव करून गौरविण्यात येणार आहे.
शासनाने या वर्षी दहा जिल्हे हगणदरीमुक्त करण्याचे ठरवले असून, यात पुणे जिल्हाही आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने त्या दृष्टीने काम सुरू केले असून, गेल्या चार महिन्यांत वेगाने काम सुरू आहे. आजच्या तारखेला ९३ हजार २९९ कुटुंबांकडे शौचालये नाहीत. जिल्हा ३१ डिसेंबरपर्यंत हगणदरीमुक्त करण्याचे ठरविले असले, तर ३० सप्टेंबरपर्यंतच ते टार्गेट पूर्ण करण्याचे ठरविले आहे.
सध्या गृहभेट अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील २२ हजारांहून जास्त जिल्हा परिषद कर्मचारी स्वच्छ भारत मिशनसाठी गावपातळीवर कार्य करीत आहेत. शौचालय नसलेल्या कुटुंबांना भेटी देऊन शौचालयाचे महत्त्व सांगत आहेत. २ आॅक्टोबर २०१६ रोजी याच अभियानाचा भाग म्हणून एकाच दिवशी सर्व ग्रामपंचायतीमध्ये गृहभेट आणि स्वच्छता उपक्रम साजरा करून राज्यात महास्वच्छता दिन साजरा केला जाणार आहे. तसेच शौचालय नाही त्यांच्या घरी जाऊन बँड व हलगीपथक जाऊन वाजविण्यात येणार आहे.
ही मोहीम सुरू झाली त्या वेळी घेतलेल्या आढाव्यात जिल्हा परिषद सदस्यांच्या गटात शौचालयाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याचे दिसले होते.
हे सर्व सदस्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर तेथील कामांना गती मिळाली आहे. हे काम आणखी वेगाने व्हावे म्हणून आता ज्या जिल्हा परिषद सदस्याचा गट हगणदरीमुक्त होणार आहे, त्यांना मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Declaration of Handicrafts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.