विषयांचे तास कमी करण्याचा निर्णय
By Admin | Updated: May 10, 2017 03:42 IST2017-05-10T03:42:13+5:302017-05-10T03:42:13+5:30
महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री आणि शिक्षण आयुक्तांनी सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीपासून आठवीपर्यंतच्या

विषयांचे तास कमी करण्याचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलपिंपळगाव : महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री आणि शिक्षण आयुक्तांनी सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीपासून आठवीपर्यंतच्या वर्गांचे कला व क्रीडा विषयांचे ५० टक्के तास कमी करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे शिक्षकांमधून नाराजीची भावना व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे कला व क्रीडा विषयांच्या ५० टक्के शिक्षकांना घराचा रस्ता पकडावा लागणार आहे.
कला विषयात चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, गायन आणि वादन अशा सहा विषयांचा अंतर्भाव असल्याने विद्यार्थिदशेत विद्यार्थ्यांना कला विषय अत्यंत महत्त्वाचा असल्याने शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी पुणे जिल्हा कलाशिक्षक संघाने शिक्षणाधिकारी हारूण आतार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या प्रसंगी अध्यक्ष किरण सरोदे, सचिव मिलिंद शेलार, उपाध्यक्ष संजय भोईटे, खजिनदार श्याम भोईटे, दिलीप पवार, जी. के. वाढे, पांडुरंग नेवसे आदींसह अन्य शिक्षक उपस्थित होते.
अतिरिक्त शिक्षणाच्या धोरणामध्ये जाणूनबुजून कलाशिक्षकांना अतिरिक्त ठरवले जात असून, त्यांना रुजू करून घेतले जात नाही. तसेच, या निर्णयाद्वारे कलाविषय आणि कलाशिक्षक हद्दपार करण्याचे हे षड्यंत्र रचले जात आहे. एकीकडे क्रीडा व कला विषयांना वाढीव गुण देऊन प्रोत्साहन द्यायचे, तर दुसरीकडे हेच विषय शिकविणाऱ्या शिक्षकांना शासन घराचा रस्ता दाखविण्याचे धोरण अवलंबीत असल्याने कला व क्रीडा क्षेत्रावर हा अन्याय आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करून शिक्षकांना न्याय मिळवून देण्याची मागणी पुणे जिल्हा कलाशिक्षक संघाने शिक्षणाधिकारी आतार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.