विकास आराखड्यातील चुका सुधारण्याचा निर्णय
By Admin | Updated: May 21, 2014 01:26 IST2014-05-21T01:26:57+5:302014-05-21T01:26:57+5:30
जुन्या हद्दीचा डीपी गेल्या वर्षी मार्चमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. मात्र, गावठाणातील मिळकतींना बांधकाम परवानगी देतानाच एफएसआय दोनऐवजी दीड करण्यात आला.
विकास आराखड्यातील चुका सुधारण्याचा निर्णय
पुणे : शहराच्या जुन्या हद्दीच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्यात (डीपी) पेठांच्या परिसरात दोनऐवजी दीड एफएसआय देण्यात झालेली प्रिटिंग मिस्टेक सुधारण्याचा नगररचना विभागाचा अहवाल येत्या आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश स्थायी समितीने महापालिका प्रशासनास मंगळवारी दिले असल्याची माहिती स्थायी समिती सदस्य हेमंत रासणे यांनी दिली. जुन्या हद्दीचा डीपी गेल्या वर्षी मार्चमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. मात्र, गावठाणातील मिळकतींना बांधकाम परवानगी देतानाच एफएसआय दोनऐवजी दीड करण्यात आला. त्याबाबत, विरोधी पक्षांसह विविध स्तरांतून आक्षेप नोंदविण्यात आल्यानंतर प्रिटिंग मिस्टेक झाल्याचा दावा प्रशासनाने केला. त्यामुळे, गावठाणातील अनेक इमारतींच्या पुनर्विकासाला आळा बसला. हरकती-सूचना नोंदविण्याच्या मुदतीमध्ये त्याबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. तसेच या मागणीसाठी भाजपने सुनावणीदरम्यानही गोंधळ घातला होता. त्याचे पडसाद आज स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. पालिकेच्या शहर सुधारणा समितीमध्येही दोनचा दीड एफएसआय करावा, असा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र, , डीपीची प्रक्रिया सुरू असल्याने हा ठराव प्रशासनाने अभिप्रायासाठी नगररचना विभागाकडे पाठविला होता. हा ठराव पाठवून सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला, तरीही अभिप्राय आला नसल्याने येत्या आठ दिवसांत तातडीने त्याची माहिती मागवून घ्यावी, अशी मागणी रासने यांनी केली. त्यानुसार, समिती अध्यक्ष बापूराव कर्णे गुरूजी यांनी पुढील बैठकीत त्याबाबतचा अहवाल सादर केला जावा, अशा सूचना केल्या असल्याचे प्रशासनाकडूनही सांगण्यात आले.