टँकरच्या धडकेने युवतीचा मृत्यू
By Admin | Updated: August 8, 2015 00:52 IST2015-08-08T00:52:32+5:302015-08-08T00:52:32+5:30
कात्रज - कोंढवा रस्त्यावर दुधाच्या टँकरने धडक दिल्याने एका युवतीला आपले प्राण गमवावे लागले. दुधाच्या भरधाव टँकरमुळे एक दुचाकी (एमएच १२-केडी १३७१) रस्त्याच्या

टँकरच्या धडकेने युवतीचा मृत्यू
आंबेगाव बुद्रुक : कात्रज - कोंढवा रस्त्यावर दुधाच्या टँकरने धडक दिल्याने एका युवतीला आपले प्राण गमवावे लागले. दुधाच्या भरधाव टँकरमुळे एक दुचाकी (एमएच १२-केडी १३७१) रस्त्याच्या कडेला घसरली. यात दुचाकीवरील युवक सुनील जावळकर (वय २०, हडपसर) हा रस्त्याच्या बाजूला पडला, तर युवती दूध टँकरच्या (एमएच १०-एडब्ल्यू ७२१२) चाकाखाली आली. या दुर्घटनेत आसावरी अनिल पाटील (वय २०) हिचा दुर्दैवी अंत झाला. या वेळी शिवगोरक्ष पटांगणात असलेले सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कदम व कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचून जखमींना खासगी रुग्णालयात हलविले.
या प्रकरणी टँकरचालक रवींद्र कलाप्पा नागराळे (वय ३५, रा. आंबेगाव खुर्द) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, या अपघातामुळे कात्रज-कोंढवा रस्त्यावर अधिकच कोंडी झाली होती. तब्बल दीड तास या रस्त्यावर वाहतूककोंडी झाली होती.
घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाणे व भारती विद्यापीठ विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. युवतीचा मृत्यू झाल्याने कार्यकर्त्यांनी काही काळ रस्ता रोखून ठेवला. मात्र, पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत झाली. या रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी जोर धरू लागली आहे. पालिकेने या प्रकरणी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
(वार्ताहर)