वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
By Admin | Updated: March 13, 2015 06:24 IST2015-03-13T06:24:50+5:302015-03-13T06:24:50+5:30
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केल्यामुळे एका शेतकरी महिलेला प्राण गमवावे लागल्याची घटना दि. ११ मार्च रोजी लोणी

वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
लोणी काळभोर : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केल्यामुळे एका शेतकरी महिलेला प्राण गमवावे लागल्याची घटना दि. ११ मार्च रोजी लोणी काळभोर येथे घडली. ही घटना सिद्राममळा परिसरात घडली. या घटनेमध्ये रेखा तानाजी काळभोर (वय ५०, रा. सिद्राममळा, लोणी काळभोर) या मृत्युमुखी पडल्या आहेत.
दहा मार्च रोजी लोणी काळभोर परिसरात वादळी-वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला होता. यामुळे झाडे उन्मळून पडली होती, तर वीजवाहक तारा तुटल्या होत्या. तक्रार देऊनही वीज वितरण कंपनीने वेळीच दक्षता न घेतल्याने, तारा जागोजागी तशाच पडून होत्या. अकरा मार्च रोजी दुपारी नेहमीप्रमाणे रेखा काळभोर या मालकीच्या शेतामध्ये काम करण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी वीजवाहक तार तेथे तुटून पडली होती. त्या तारेला स्पर्श होताच विजेचा झटका बसून त्या जागीच मृत्युमुखी पडल्या.
या घटनेची माहिती लवकर इतरांना समजली नाही. त्या घरी आल्या नाहीत म्हणून त्याचे कुटुंबीय सायंकाळी त्यांचा शोध घेण्यासाठी शेतात गेले. त्या वेळी सदर प्रकार रात्री उघडकीस आला. (वार्ताहर)