शिरूरच्या चौघांचा मृत्यू
By Admin | Updated: April 15, 2017 03:49 IST2017-04-15T03:49:49+5:302017-04-15T03:49:49+5:30
कानगाव (ता. दौंड) येथील भीमा नदीवरील बंधाऱ्यात कार कोसळल्याने या अपघातात चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी पावणेचारच्या सुमारास घडली.

शिरूरच्या चौघांचा मृत्यू
पाटस / शिरसगाव काटा : कानगाव (ता. दौंड) येथील भीमा नदीवरील बंधाऱ्यात कार कोसळल्याने या अपघातात चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी पावणेचारच्या सुमारास घडली.
नंदा दीपक गायकवाड (रा. मांडवगण, ता. शिरुर), नवनाथ हरिभाऊ पवार, प्रतिभा नवनाथ पवार, आबासो प्रल्हाद जठार (तिघेही रा. सादलगाव, ता. शिरुर) या चौघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शिरुर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. वरील चौघेही कारने (एमएच १२ एलडी ६७२0) दौंडहून कानगावमार्गे मांडवगण फराटा येथे निघाले होते. दौंड येथील एका रुग्णालयातून एका महिलेवर उपचार घेऊन कारमधून जात असताना त्यांच्यावर कानगाव बंधाऱ्याच्या परिसरात काळाने झडप घातली.
दरम्यान ही कार कानगाव (ता. दौंड) हद्दीतील भीमा नदीवरील बंधाऱ्याचा रस्ता सुरु होण्याच्या अलीकडच्या रस्त्यावरुन घसरली आणि ती पलट्या मारत थेट बंधाऱ्यातील पाण्यात कोसळली. ही घटना बंधाऱ्याच्या परिसरातील काही लोकांनी बघितली. या घटनेची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने कानगाव-मांडवगण परिसरातील ग्रामस्थ अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले. बंधाऱ्याच्या परिसरात मांडवगण-कानगाव पुलाचे काम सुरु आहे. या कामासाठी क्रेन होती. या क्रेनच्या सहाय्याने बंधाऱ्यात पडलेल्या कारला सुमारे अर्ध्या तासानंतर काढण्यात आले. तोपर्यंत कारमधील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
चारही मृत व्यक्तींना न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे, शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. (वार्ताहर)