चोरट्यांच्या हल्ल्यात ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: September 10, 2015 04:18 IST2015-09-10T04:18:34+5:302015-09-10T04:18:34+5:30

केसनंद परिसरातील चारवडा पाटीलवस्ती येथे भरदिवसा चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला. तर दुसरी महिला गंभीर जखमी आहे. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

Death of senior woman in thirties | चोरट्यांच्या हल्ल्यात ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

चोरट्यांच्या हल्ल्यात ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

वाघोली : केसनंद परिसरातील चारवडा पाटीलवस्ती येथे भरदिवसा चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला. तर दुसरी महिला गंभीर जखमी आहे. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
९० वर्षीय वृद्धेस गजाने मारहाण करून चाकूने वार करण्यात आले. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. हल्लेखोरांनी घरातील वस्तूंची उलथापालथ केली असल्याने चोरीच्या उद्देशातून त्यांच्यावर हल्ला झाला असण्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सोनाबाई बाबूराव गिरीगोसावी (वय ९०) असे मृत महिलेचे नाव आहे. राधा दिलीप ढवळे (वय २५) अशी गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. केसनंद येथील चारवाडा पाटीलवस्ती परिसरामध्ये सोनाबाई गिरीगोसावी या एकट्याच घरामध्ये राहतात. त्यांच्या शेजारी दिलीप ढवळे यांचे सहा जणांचे कुटुंब वास्तव्यास आहे. बुधवारी सकाळी ९.३० च्या सुमारास राधा ढवळे वगळता इतर सर्व सदस्य घराच्या बाहेर गेले होते. १०.३० वाजता राधा ढवळे यांचे आजेसासरे बाबासाहेब ढवळे घरी परतले. सीमाभिंतीला कुलूप लावले असल्याने त्यांनी आतमध्ये गेट उघडण्याकरिता आवाज दिला असता, कोणीही प्रतिसाद दिला नाही. सीमाभिंत ओलांडून बाबासाहेब ढवळे आतमध्ये गेले असता, घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. स्वयंपाकघरामध्ये पाहिले असता राधा ढवळे यांच्या मानेजवळ चाकू भोसकून रक्तबंबाळ झाल्याचे दिसले. लोणीकंद पोलिसांना घटनेची माहिती समजल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथकाची मदत घेण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, पोलीस उपअधीक्षक वैशाली कडूकर, राजेंद्र मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. लोणीकंद ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. राधा ढवळे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

नागरिकांमध्ये घबराट
पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, लोणीकंद पोलीस ठाण्यांतर्गत चोरट्यांचा धुमाकूळ असल्याची अफवा पसरविल्या जात होत्या. बुधवारी दिवसाढवळ्या दोन महिलांवर झालेल्या हल्ल्यामुळे अफवांना जोड मिळाली असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Death of senior woman in thirties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.