मारहाणीत चोरट्याचा मृत्यू
By Admin | Updated: January 14, 2015 23:57 IST2015-01-14T23:57:46+5:302015-01-14T23:57:46+5:30
पाकीटमार व भुरट्या चोराचा, तरुणांनी केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाला. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना

मारहाणीत चोरट्याचा मृत्यू
राजगुरुनगर : पाकीटमार व भुरट्या चोराचा, तरुणांनी केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाला. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना दि. १२ जानेवारी रोजी रात्री घडली. या तरुणांपैकी चार जणांना अटक करून पोलीस कोठडी देण्यात आली.
गणेश मल्हारी वाघमारे (वय २३, रा- चांडोली, ता. खेड) असे मृत्युमुखी पडलेल्या चोराचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. १२ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता राजगुरुनगर बस स्थानकाच्या आवारात ही घटना घडली. राखी ज्ञानेश्वर हांडे (रा. मंचर) या महिलेची पर्स चोरी केल्याच्या कारणावरून वाघमारे यास या महिलेचे नातेवाईक विजय पाराजी हांडे आणि त्याच्या जोडीदारांनी लाथा-बुक्क्या आणि काठीने बेदम मारहाण केली. त्यास ठार मारून त्याचे प्रेत चांडोली येथे कडूस रस्त्यालगत आणून टाकले, अशी फिर्याद मृताच्या वडिलांनी दिली. त्याचा मृतदेह १३ जानेवारी रोजी सकाळी लोकांना आढळून आल्यावर त्याच्या घरच्यांना कळविण्यात आले. शवविच्छेदन करण्यात आले. मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. पोलिसांनी विजय हांडे, धनंजय पवळे, अमित राक्षे, विजय रोकडे, संकेत होले, मुकुंद राक्षे, तेजस कचाटे, बंटी राक्षे या आठजणांसह इतर १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)