शिक्रापूरला हॉटेल कामगाराचा मृत्यू
By Admin | Updated: February 12, 2017 04:43 IST2017-02-12T04:43:49+5:302017-02-12T04:43:49+5:30
येथे हॉटेल कामगारांच्या झालेल्या भांडणाच्या रागातून एका हॉटेल कामगाराने दुसऱ्या हॉटेल कामगाराच्या जिलेबी काढण्याच्या लोखंडी उलथण्याने डोक्यात मारले असता डोक्याला

शिक्रापूरला हॉटेल कामगाराचा मृत्यू
शिक्रापूर : येथे हॉटेल कामगारांच्या झालेल्या भांडणाच्या रागातून एका हॉटेल कामगाराने दुसऱ्या हॉटेल कामगाराच्या जिलेबी काढण्याच्या लोखंडी उलथण्याने डोक्यात मारले असता डोक्याला मार लागल्याने हॉटेल कामगाराचा मृत्यू झाला आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी : येथील आठवडेबाजारात मनोहर खुर्पे यांचा हॉटेल व्यवसाय आहे. त्यांच्याकडे बिज्रभान सौखीलाल कोरी (रा. तळेगाव ढमढेरे) तसेच संजय शंकर भुजबळ (रा. कासारी, ता. शिरूर) हे हॉटेलमध्ये काम करणारे कामगार आहेत. शिक्रापूर येथील बाजारात हॉटेल सुरू असताना हॉटेलमधील कामावरून दोघांचे भांडण झाले, त्या वेळी बिज्रभान कोरी याने संजय भुजबळ यांच्या तोंडात चापट मारली. या वेळी हॉटेल मालक खुर्पे यांनी भांडणे सोडवली; परंतु नंतर बिज्रभान कोरी हा हॉटेलच्या मागील बाजूला लघुशंकेसाठी गेला असता संजय भुजबळ याने थोड्या वेळापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून हॉटेलमधील जिलबी काढण्याच्या लोखंडी उलथण्याने बिज्रभान कोरी यांच्या डोक्यात मारले. या वेळी बिज्रभान हा जागेवर खाली कोसळला तेव्हा मनोहर खुर्पे त्यांच्याकडे धावून गेले असता संजय भुजबळ हा लोखंडी उलथने तेथे टाकून पळून गेला. यांनतर तेथील काही नागरिकांनी जखमी बिज्रभान कोरी याला शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.
यांनतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होता असताना अचानक त्याला पुणे येथे दाखल करण्यात आले; परंतु तेथे बिज्रभान सौखीलाल कोरी (रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) या हॉटेल कामगाराचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याबाबत हॉटेलचालक मनोहर खुर्पे (रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली असून, शिक्रापूर पोलिसांनी आरोपी संजय शंकर भुजबळ (रा. कासारी, ता. शिरूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपीला शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.