अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर डिलरचे प्रतिनिधी
By Admin | Updated: April 24, 2015 03:38 IST2015-04-24T03:38:50+5:302015-04-24T03:38:50+5:30
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) दुचाकी आणि मोटार वाहन डिलरचे (वितरक) प्रतिनिधी क्लार्क आणि अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून संगणकावर

अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर डिलरचे प्रतिनिधी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) दुचाकी आणि मोटार वाहन डिलरचे (वितरक) प्रतिनिधी क्लार्क आणि अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून संगणकावर थेट नोंदणी, रेकॉर्ड आणि रजिस्टरचे
काम करीत होते. अधिकाऱ्यांच्या शेजारी बसून आपली कामे करुन
घेत होते. कंपनीचा लोगो
असलेले पांढऱ्या-निळ्या रंगाच्या गणेवशातील हे प्रतिनिधी कार्यालयात आपले काम बिनधास्तपणे करीत होते. या पद्धतीने नियमितपणे काम केले जात असल्याने त्याच्या चेहऱ्यावर आपणच अधिकारीच असल्याचा भाव स्पष्ट दिसत होते.
आरटीओ कार्यालयात एजंटाना प्रवेश बंदी लागू केली होती. एजंट आणि नागरिकांना कार्यालयातील विविध विभागाच्या कक्षात प्रवेश दिला जात नाही. मात्र, वाहन डिलरचे प्रतिनिधी थेट केबीनमध्ये बसून कामकाज करतात. हे चित्र गुरुवारी दुपारी केलेल्या स्टींग आॅपरेशनमध्ये उघड झाले. शहरात विविध कंपन्यांची दुचाकी आणि मोटार, तसेच अवजड वाहनांचे जवळपास ४० शोरूम आहेत. आरटीओचे कामकाज करण्यासाठी शोरूमचा प्रत्येक एक प्रतिनिधी नेमलेले आहेत. यातील काही कार्यालय इमारतीच्या ४६ क्रमांकाच्या दालनात बसलेले दिसले. रोज येणे-जाणे असल्याने प्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे सलोख्याचे संबंध असल्याचे एकूण त्याच्या वर्तणुकीवर दिसले. स्वत: अधिकारी काही नागरिकांना भेटायचे कोणाला, हाच प्रश्न पडला होता.
या प्रतिनिधींचा थेट वावर कार्यालयात सुरू होता. वाहन कंपनीचा लोगो असलेले निळ्या व पांढऱ्या रंगाचे गणवेश परिधान केलेले हे प्रतिनिधी हातात कागदपत्रांचे गठ्ठे घेऊन कार्यालयातील वेगवेगळ्या विभागांत सर्वत्र दिसत होते. थेट कामकाज होत असलेल्या केबिनमध्ये विनापरवाना ये-जा करीत होते. संबंधित क्लार्कच्या खुर्चीवर बसून दुचाकी आणि मोटार वाहनांची रजिस्टर नोंदणी, रेकॉर्डची नोंदणी, वाहन क्रमांक आदी नोंदणी ते स्वत: संगणकावर करीत होते. विनाअडथळा काम व्हावे क्लार्क आणि अधिकाऱ्यांनीच त्यांना संगणकाचा कोड नंबर ठेवला होता. क्लार्क केबिनमध्ये उपस्थित नसतानाही हे प्रतिनिधी थेट प्रवेश करीत आपले काम बिनधास्तपणे करीत होते. स्वाक्षरी करण्याचा आपल्या कामात अती व्यस्त असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कोणीच घेणे देणे नव्हते.
क्लार्क उपस्थित असतानाही त्याच्या शेजारी बसून ते आपले काम प्राधान्याने करून घेत असल्याचे चित्र दिसले. अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून आपली कामे साध्य करून घेताना काही प्रतिनिधी दिसले. यामुळे अधिकारी कोण व डिलरचा प्रतिनिधी कोण, हे ओळखणे नागरिकांना मुश्कील झाले होते. विविध अडचणीबाबत त्यांना नागरिकांनी विचारले असता, रांगेत थांबा किंवा थोडा वेळाने येण्याचा सल्ला दिला जात होता.
खिडकीच्या बाहेर नागरिकांची कितीही मोठी रांग असली, हे मंडळी केबिनचा दरवाजा उघडून थेट आतमध्ये प्रवेश करीत होते. फायलीतील कागदपत्रे काढून आपले काम प्रथम करून घेत होते.
यामुळे रांगेत उभे असलेल्या नागरिकांना अधिक वेळ ताटकळत उभे राहावे लागत होते. या संदर्भात नागरिकांनी रोष व्यक्त केला, तरी त्याच्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात होते. प्रथम प्रतिनिधीचे काम मार्गी लावले जात होते. लक्ष्मी दर्शनाच्या लाभामुळे त्याच्या बाबतीत कर्मचाऱ्यांकडून तत्परता दाखवली जाते असल्याची चर्चा संतप्त नागरिकांमध्ये सुरू होती.
कार्यालयात मनुष्यबळ कमी असल्याने संबंधिंत क्लार्कवर कामाचा मोठा ताण असतो. डिलरचे प्रतिनिधी स्वत:हून नोंदणी आणि इतर कामे करीत असल्याने त्यांचे काम हलके होते. त्यामुळे क्लार्क त्यांचे स्वागतच करीत होते. त्याच्याशी मस्तपैकी गप्पा मारत काम सुरू वेगवेगळ्या केबीनमध्ये सुरू होते.
सहभाग : मिलिंद कांबळे, अतुल मारवाडी, नीलेश जंगम.