सांगवीमध्ये रियल इस्टेट व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 16:09 IST2018-05-02T16:09:48+5:302018-05-02T16:09:48+5:30
रात्रीचे जेवण झाल्यानंतर शतपावलीसाठी बाहेर पडलेल्या रियल इस्टेट व्यावसायिक तरुणाला दगडाने मारहाण करुन प्राणघातक हल्ला करण्यात आला.

सांगवीमध्ये रियल इस्टेट व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला
पिंपरी : रात्रीचे जेवण झाल्यानंतर शतपावलीसाठी बाहेर पडलेल्या रियल इस्टेट व्यावसायिक तरुणाला दगडाने मारहाण करुन प्राणघातक हल्ला करण्यात आला. डोक्यात, तोंडावर जखमा झाल्या असून खासगी रुग्णालयात त्यास दाखल केले आहे. हा प्रकार मंगळवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास जुनी सांगवी येथे घडला.
संदीप जगताप असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. रेणुका संदीप जगताप (वय ३९ , रा. वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवी) यांनी या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणुका यांचे पती संदीप यांना रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करण्याची सवय आहे. नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास रात्रीचे जेवण झाल्यानंतर ते शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले. सोसायटीच्या बाहेरच्या बाजूला गेले असताना सव्वादहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात दगड फेकून मारला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संदीप रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात. या व्यवसायातील स्पर्धेतून कोणी असा प्रकार केला की अजून दुसरे काही कारण यामागे आहे, याचा तपास सांगवी पोलीस करत आहेत.