२७ सप्टेंबरची डेडलाईन
By Admin | Updated: September 13, 2014 05:20 IST2014-09-13T05:20:57+5:302014-09-13T05:20:57+5:30
अगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना २७ सप्टेंबर पर्यंत नावनोंदणी करण्याची संधी आहे. या तारखेपर्यंत नागरिकांनी अर्ज केल्यास त्यांचे नाव आगामी निवडणुकीतील मतदार यादीत समाविष्ट करण्यात येईल

२७ सप्टेंबरची डेडलाईन
पुणे : अगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना २७ सप्टेंबर पर्यंत नावनोंदणी करण्याची संधी आहे. या तारखेपर्यंत नागरिकांनी अर्ज केल्यास त्यांचे नाव आगामी निवडणुकीतील मतदार यादीत समाविष्ट करण्यात येईल. या शिवाय नागरिकांनी मतदार यादीत नाव असल्याची खात्री करावी तसेच नाव नसल्यास तत्काळ नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी राव यांनी ही माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समीक्षा चंद्राकर उपस्थित होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २७ सप्टेंबर आहे. यापूर्वी नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या दहा दिवस आधी मतदार नोंदणी अर्ज भरल्यास त्या व्यक्तीस आगामी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येईल, असे स्पष्ट केले होते. मात्र आयोगाने नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज भरण्याची सूचना केली आहे.
राव म्हणाले, नामनिर्देशन अर्ज भरल्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत अर्ज करणाऱ्या व्यक्तींची नावे मतदार यादीत असतील याची काळजी घेण्यात येईल. तसेच गेल्या निवडणुकीत मतदान केले म्हणून यादीत नाव असेल म्हणून निर्धास्त न राहता याबाबत खात्री करावी.
गेल्या काही महिन्यांत शहर, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातून २ लाख ६४ हजार मतदारांनी नोंदणी केली आहे. अद्यापही ज्यांनी मतदारयादीत नाव समाविष्ट केले नाही, त्यांनी तातडीने कागदपत्रे व अर्ज संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे सादर करावेत, असे आवाहन राव यांनी केले. (प्रतिनिधी)