भोर शहराला दिवसाआड पाणी, तेही दूषित
By Admin | Updated: June 8, 2015 04:54 IST2015-06-08T04:54:41+5:302015-06-08T04:54:41+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भाटघर धरणात पाणीसाठा अत्यंत कमी झाला आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या दोनपैकी एका इंटेकवेलला पाणी कमी पडत असल्याने एक मोटार बंद आह.

भोर शहराला दिवसाआड पाणी, तेही दूषित
भोर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भाटघर धरणात पाणीसाठा अत्यंत कमी झाला आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या दोनपैकी एका इंटेकवेलला पाणी कमी पडत असल्याने एक मोटार बंद आह. त्यामुळे शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरूआहे, त्यातच तर एक फिल्टर प्लांट बंद असल्याने निम्म्या शहराला दूषित पाणी प्यावे लागत आहे.
भाटघर धरणाच्या खाली १९७४ साली विहीर काढून पहिली नळ पाणीपुरवठा योजना करण्यात आली. तर १९९० साली नवीन इंजिनघर बांधण्यात आले. भाटघर ते शंकरहिलदरम्यान ७ किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. ९० एचपीचे २ व ५० एचपीचे २ असे चार पंप असून त्यापैकी दोन पंपांनी पाणीपुरवठा सुरूआहे. दररोज साधारणपणे २० लाख लिटर पाणीपुरवठा होतो. मात्र धरणात सध्या फक्त १.७० टक्के अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे एका इंटेकवेलला पाणी पुरत नाही. परिणामी पाणी विहिरीत जात नसल्याने एक पंप बंद आहे. त्यातच दोनपैकी एकच फिल्टर प्लांट सुरु असल्याने निम्म्या भोर शहराला दूषित पाणी प्यावे लागत आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
दुसऱ्या इंटेकवेलला पाणी पुरावे म्हणून धरणाच्या वॉलमधून सोडलेले पाणी बांध घालून चारी काढून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अडवले आहे. मात्र तरीही पाणी येत नाही. त्यासाठी नदीपात्रात जे.सी.बी. लावून चारी काढली तरच पाणी पुरणार आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात धरणातील पाणी कमी पडले की ही परिस्थती निर्माण होते. पुन्हा धरणे भरुन पाणी सोडेपर्यंत साधारणपणे मे ते आॅगस्ट महिन्यापर्यंत अशीच अवस्था असते. यावर भोर नगरपालिकेने कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यातच नगरपालिकेकडे कायमस्वरुपी कर्मचारी कमी असल्याने ७ ते ८ जणांना तातपुरत्या स्वरुपात कर्मचारी घेतले आहेत. मात्र निधीअभावी अनेकदा सदरच्या कर्मचाऱ्यांना कमी केले जाते.
भाटघर धरणात अत्यंत कमी पाणीसाठा असल्याने धरणातील पाणी सोडणे बंद केल्याने धरणाचे पावर हाऊसही बंद झाले आहे. धरणाच्या मेनगेटवॉलमधून पाणी सोडण्याची मागणी केल्यावर पाटबंधारे विभागाने पाणी सोडले आहे. मात्र धरणात पाणीच कमी असल्याने सदरचे पाणी एकाच इंटेकवेलला पुरते. दुसऱ्याला जात नाही. त्यामुळे शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे.
(वार्ताहर)