घाटाकडील तीव्र उतार धोकादायक

By Admin | Updated: June 11, 2015 06:10 IST2015-06-11T06:10:32+5:302015-06-11T06:10:32+5:30

बोपखेल रहिवाशांसाठी मुळा नदीवरील तरंगता पूल खुला करून४ दिवस झाले आहेत. पावसामुळे खराब झालेले खडकीकडील जोड मार्गावरील

Dangerous slope of the valley is dangerous | घाटाकडील तीव्र उतार धोकादायक

घाटाकडील तीव्र उतार धोकादायक

मिलिंद कांबळे, पिंपरी
बोपखेल रहिवाशांसाठी मुळा नदीवरील तरंगता पूल खुला करून४ दिवस झाले आहेत. पावसामुळे खराब झालेले खडकीकडील जोड मार्गावरील मातीचे रस्ते दुरुस्ती काम सीएमईच्या लष्करी जवान करीत आहेत. बोपखेल घाटाच्या जोडरस्ताच्या तीव्र उतारामुळे वाहने घसरून अपघात होण्याचा धोका आहे.
बोपखेलच्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी जवळचा पर्यायी मार्ग म्हणून तरंगता पूल गेल्या रविवारी (दि. ७) खुला करण्यात आला. सीएमईच्या जवानांनी हा पूल तयार केला आहे. यावरून नागरिकांनी ये-जा सुरू केली आहे. तसेच, दुचाकी, रिक्षा, टेम्पो, मोटार आदी वाहनांची वाहतूक केली जात आहे. खडकीच्या ५१२ आर्मी बेसवर्कशॉपच्या बाजूने माती असल्याने पावसामुळे चिखल झाल्याने खड्डे पडले होते. त्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांची गैरसोय होत होती. तसेच, येथे प्रकाश व्यवस्था नसल्याने संध्याकाळनंतर हा परिसर असुरक्षित वाटतो. विशेषत: महिलांना ये-जा करण्यास भीती वाटते.
बोपखेलच्या बाजूने जोडलेल्या पुलापेक्षा घाटाची उंची अधिक आहे. याच स्थितीत तरंगता पूल आणि घाट जोडला आहे. यासाठी तयार केलेला रस्ता कच्चा आहे. या तीव्र उतारामुळे वाहने घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेषत: दुचाकी आणि प्रवाशांनी भरलेली रिक्षा,अधिक वजनाच्या वाहनावरील नियंत्रण सुटून दुर्घटना घडण्याची भीती आहे. पुलास हा रस्ता मातीने जोडल्याने तो अद्याप कच्चा मार्ग आहे. यामुळे रस्त्यावरील खडी उघडी पडली आहे. वाहनांच्या चाकामुळे ही खड्डी आजूबाजूस जोरात उडत असल्याने शेजारून जाणारी एखादी व्यक्ती जखमी होण्याची शक्यता आहे.
तसेच, पुलाचा पृष्ठभाग लोखंडी आहे. तो खूपच गुळगुळीत आहे. त्यामुळे वाहन घसरून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात पाणी आणि चिखलामुळे पूल अधिक निसरडा होतो. या निसरड्या पुलावरून विशेषत: दुचाकी वाहने घसरण्याची अधिक शक्यता आहे. तसेच, पुलाच्या बाजूने सुरक्षा कठडे नाहीत. केवळ दोरी बांधली आहे. पुलावरुन ये- जा करताना नदी पात्रात डोकावणारे लहान मुले पाण्यात पडू शकतात. नियंत्रण सुटलेले वाहन थेट पाण्यात पडू शकते. पुलाची रुंदी कमी असल्याने रिक्षा, टेम्पो, मोटार येत असले, तर दुसऱ्या बाजूची वाहने थांबविली जातात. मर्यादित वेगात वाहन येथून नेता येते.
जड वाहनांना बंदी
या पुलावरून दुचाकी, रिक्षा, टेम्पो आणि मोटार याच वाहनांना प्रवेश दिला जात आहे. अधिक वजनाच्या वाहनास प्रवेश नाही.

Web Title: Dangerous slope of the valley is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.