येलवाडीत धोकादायक विजेचे खांब

By Admin | Updated: May 10, 2017 03:42 IST2017-05-10T03:42:47+5:302017-05-10T03:42:47+5:30

येलवाडी (ता.खेड) परिसरातील विविध ठिकाणी विजेचे धोकादायक खांब उभे असल्यामुळे मॉन्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह

Dangerous electric pillars in Yelvadi | येलवाडीत धोकादायक विजेचे खांब

येलवाडीत धोकादायक विजेचे खांब

लोकमत न्यूज नेटवर्क
महाळुंगे : येलवाडी (ता.खेड) परिसरातील विविध ठिकाणी विजेचे धोकादायक खांब उभे असल्यामुळे मॉन्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह दाखल होणाऱ्या पावसात ते पडून एखादी दुर्घटना घडण्याचा संभव निर्माण झाला आहे. मुख्य रस्त्याकडेला असणारा रोहित्र रहदारीस अडथळा ठरु लागल्यामुळे तोही तातडीने हलविण्याची किंवा त्याला संरक्षण करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
कडक उन्हाळा जाणवू लागला असतानाच जिल्हावासीयांसाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने सर्वसामान्यांचा विश्वास न बसणारी गोड आणि आनंदाची बातमी नव्हेतर प्रत्यक्ष कृती करुन दाखवून दिली. ती म्हणजे ऐन कडक उन्हाळ्यात होणारे चार ते आठ तासाचे भारनियमन पूर्णत: बंद करुन अखंडित वीज पुरवठा सुरु केल्यामुळे नागरिकांनी महावितरण कंपनीला धन्यवाद दिले आहेत.
गेल्या दहा वषार्पूर्वीचा आणि सध्याचा काळ नागरिक अनुभवत असताना वीज कंपनीबाबतच्या तक्रारींचे प्रमाण अगदीच अल्प झाले आहे. पर्यायाने ते राहिलेले नाही असे म्हटले तर वावगे ठरु नये. वीज टंचाईच्या कालावधीत दैनंदिन होणारे भारनियमन आणि अतिरिक्त भारनियमन यामुळे सर्वसामान्य जनता अक्षरश: वैतागून गेली होती. शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला होता. अपवाद सोडता मात्र महावितरणने पुणे जिल्ह्यात केलेल्या कामगिरीचे फळ म्हणूनच, की काय सर्वसामान्यांची भारनियमनातून मुक्तता झाली आहे. त्यामुळे नागरिक महावितरणला धन्यवाद देत आहेत.
परिसरातील अनेक शेतातील, गावठाणातील आणि प्रमुख मार्गाकडेने वीज कंपनीने उभे केलेले खांब वाकले असल्यामुळे धोकादायक स्थितीत उभे राहिल्यामुळे त्यावरुन गेलेल्या विद्युतवाहिन्या लोंबकळू लागल्या आहेत. याशिवाय स्वांतत्र्यपूर्व काळात गावोगावी आणि शहरात उभे केलेले लोखंडी खांब खालून सडले आहेत. त्या खांबांना आधार म्हणून गेल्या काही वर्षापुर्वी कंपनीने ठेका पध्दत अवलंबून जमिनीवर एक ते दीड फुटांपर्यंत सिमेंटने बंधिस्ती करुन मजबुती आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ती मजबुती केवळ दिखावू असून टिकावू नसल्यामुळे अनेक
ठिकाणी गंभीर स्वरुपाचे अपघात झाले आहेत. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील सडले, कुजलेले आणि तांबरलेले आणि धोकादायक स्थितीत उभे असलेले लोखंडी खांब बदलण्याची मागणी सातत्याने होवू लागली आहे.

Web Title: Dangerous electric pillars in Yelvadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.