दुर्गंधीयुक्तपाण्याचा होतोय पुरवठा
By Admin | Updated: June 18, 2015 00:03 IST2015-06-18T00:03:35+5:302015-06-18T00:03:35+5:30
प्रभाग क्रमांक २ पठारे-ठुबेनगर, पठारे मळा, चौधरीवस्ती, पाराशर सोसायटी, तुळजा-भवानीनगर, दिनकर पठारेवस्ती परिसरात

दुर्गंधीयुक्तपाण्याचा होतोय पुरवठा
चंदननगर : प्रभाग क्रमांक २ पठारे-ठुबेनगर, पठारे मळा, चौधरीवस्ती, पाराशर सोसायटी, तुळजा-भवानीनगर, दिनकर पठारेवस्ती परिसरात पाच दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीतून दूषित, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तीन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे.
पठारे-ठुबेनगर, पठारेमळा, चौधरीवस्ती, पाराशर सोसायटी, तुळजा भवानीनगर, दिनकर पठारेवस्तीत कामानिमित्त अनेक भागांतून येऊन नागरिक
स्थायिक झाले आहेत. त्यामुळे
परिसरात लोकसंख्येचे प्रमाणही
मोठे आहे.
अनेक दिवसांपासून या परिसराला दूषित, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ज्या
ठिकाणांहून जलवाहिनी जाते त्यालगतच ड्रेनेजवाहिनी टाकण्यात आली आहे.
ड्रेनेजमधील घाण पाणी पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीत मिसळले जात असल्याची शक्यता आहे. त्यामुळे दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे.
याबाबत मनसेचे वडगावशेरी विभाग प्रमुख स्वप्निल चव्हाण, संदीप काची, मनोज ठोकळ, सुनील निकम, विक्रम चव्हाण, तोसिफ शेख यांनी बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाला निवेदन व दूषित पाण्याचे नमुने दिले.
(वार्ताहर)
मुले, ज्येष्ठांना त्रास
या समस्येचा सर्वाधिक त्रास लहान मुलांना, ज्येष्ठांना होत असून, उलट्या, जुलाब, ताप यासारखे आजार जडले आहेत.
ऐन पावसाळ्यात दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, लहान मुलांना विविध साथीच्या आजारांची लागण होण्याची शक्यता आहे.
- स्वप्निल चव्हाण,
मनसे विभाग प्रमुख