खंडणीसाठी व्यापाऱ्यावर घातक हल्ला
By Admin | Updated: February 14, 2017 01:50 IST2017-02-14T01:50:42+5:302017-02-14T01:50:42+5:30
केडगाव (ता. दौंड) बाजारपेठेतील व्यापारी विकास पोपटलाल छाजेड (वय ४८, रा. केडगाव) यांच्यावर ५ लाख रुपये खंडणी

खंडणीसाठी व्यापाऱ्यावर घातक हल्ला
केडगाव : केडगाव (ता. दौंड) बाजारपेठेतील व्यापारी विकास पोपटलाल छाजेड (वय ४८, रा. केडगाव) यांच्यावर ५ लाख रुपये खंडणी देण्याच्या कारणावरून प्राणघातक हल्ला झाला. ही घटना रविवारी रात्री ११ च्या सुमारास घडली. याबाबत व्यापारी छाजेड यांच्या आई पुष्पा छाजेड यांनी यवत पोलिसांना फिर्याद दिली आहे.
यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छाजेड यांचे केडगाव बाजारपेठेत किराणा व भुसार मालाचे होलसेल दुकान आहे. या दुकानाच्या पहिल्या मजल्यावरच छाजेड आपल्या कुटुंबीयांसह राहतात. दररोज नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून छाजेड घरामध्ये गेले. रात्री झोपेमध्ये अमोल शिवाजी बनकर (रा. पिसेवस्ती, केडगाव) व एका अज्ञात आरोपींनी छाजेड यांना झोपेतून उठवून दुकानासमोर आणले व ५ लाख रुपये खंडणीची मागणी केली. या मागणीला छाजेड यांनी नकार देताच आरोपींनी त्यांना मारहाण केली व चाकूने मान व पोटावर वार केले. छाजेड यांनी आरडाओरडा करताच शेजारील व्यापारी नितीन कटारिया जागे झाले. आरोपी पळून गेले. जखमी छाजेड यांना पुणे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. छाजेड अतिदक्षता विभागात असून त्यांची प्रकृती नियंत्रणाखाली असल्याचे समजते.
हे आरोपी फरार असून शोध घेण्याचे काम चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना छाजेड यांनी आपल्या दुकान परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. यामध्ये आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत.(वार्ताहर)