बिबट्याची दहशत
By Admin | Updated: March 7, 2015 22:50 IST2015-03-07T22:50:55+5:302015-03-07T22:50:55+5:30
वन विभागांतर्गत येणाऱ्या मांदारणे गावातील साबरवाडीत रात्रीच्या वेळी लघुशंकेसाठी घराबाहेर आलेल्या मुलीवर बिबट्याने हल्ला करून तिला जखमी केले.

बिबट्याची दहशत
मढ : जुन्नर तालुक्यात बिबट्याचे नागरिकांवर हल्ले सुरूच आहेत. काल (दि. ६) ओतूर वन विभागांतर्गत येणाऱ्या मांदारणे गावातील साबरवाडीत रात्रीच्या वेळी लघुशंकेसाठी घराबाहेर आलेल्या मुलीवर बिबट्याने हल्ला करून तिला जखमी केले. तिला प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपचार घेऊन पुढील उपचारांसाठी पुण्यातील वाय.सी.एम. रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
याबाबत उदापूरचे वनरक्षक एस.जी. मोमीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, साबरवाडीतील नेहा लक्ष्मण काळे ही रात्री घरातून लघुशंकेसाठी बाहेर आली. त्या वेळी तिच्याबरोबर पाळीव कुत्राही होता. समोरून आलेल्या बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता, कुत्रा पळाला व बिबट्याचा पंजा नेहाला लागला. त्यानंतर घरच्यांनी व साबरवाडीतील नागरिकांनी तिला उपचारासाठी दवाखान्यात आणले. तिला उपचारासाठी ओतूर येथे आणत आहोत, अशी माहिती मांदारण्याचे माजी सरपंच देवराम भले यांना फोनवरून मिळाली. त्यानुसर नेहाला ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी पिंपरी चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवण्यात आले.
या घटनेनंतर वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. रघतवान व सर्व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परंतु, त्यांना बिबट्याचा मार्ग सापडला नाही. या घटनेमुळे डिंगोरे, उदापूर, मांदारणे, अहिनवेवाडी, सारणी या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. वाड्यावस्त्यांवर संध्याकाळनंतर अघोषित संचारबंदीच लागल्याची परिस्थिती आहे. बिबट्याला पकडण्याची तयारी वनविभागाकडून सुरू झाली आहे.
(वार्ताहर)
४आतापर्यंत बिबट्याने परिसरात दि. २२ जानेवारीला अहिनवेवाडी येथील गोटी शिवार येथे सुनीता गणेश महाकाळ, दि. २९ जानेवारीला उदापूर-मांदारणे मार्गावर बाळासाहेब बबन महाकाळ, दि. १२ फेबु्रवारीला ढमालेमळा मार्गावर शीतल गणेश जगताप, तसेच दि. २३ फेबु्रवारीला निर्मला शिवाजी पारधी यांना गंभीर जखमी केले आहे. डिंगोरे येथील मराडवाडीच्या ओढ्यात एक मृत बिबट्या आढळला होता. दि. १३ फेब्रुवारीला ढमालेमळा येथे वनविभागाच्या पिंजऱ्यात एका बिबट्याची मादी जेरबंद झाली. याच काळात दि. २६ फेबु्रवारीला रात्री आठ ते नऊच्या दरम्यान उदापूरला बिबट्याने शेळ्यांवर हल्ला करून एक ठार तर एक उचलून नेली आहे.
४ वन विभागाकडून परिसरात जनजागृती अभियान राबविले जात आहे. बिबट्याविषयी माहितीफलक, वन्यजीव अभ्यासकांची व्याख्याने, विविध ठिकाणी पिंजरे लावणे, पाहणी करणे, जखमींना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे इत्यादी कामे सुरूआहेत.