नदीकाठावर पुराचा धोका २० हजार क्युसेक्सलाच
By Admin | Updated: June 10, 2015 05:37 IST2015-06-10T05:37:52+5:302015-06-10T05:37:52+5:30
खडकवासला प्रकल्पातील धरणांमधून २० हजार क्युसेक्सने पाणी सोडल्यावरही नदीकाठावरील रहिवाशांसाठी धोकादायक ठरू शकते.

नदीकाठावर पुराचा धोका २० हजार क्युसेक्सलाच
पुणे : खडकवासला प्रकल्पातील धरणांमधून २० हजार क्युसेक्सने पाणी सोडल्यावरही नदीकाठावरील रहिवाशांसाठी धोकादायक ठरू शकते. नदीपात्रात झालेली अतिक्रमणे आणि पडलेला राडारोडा यामुळे नदीची वहनक्षमता कमी झाली असल्याची अप्रत्यक्ष कबुली महापालिकेतर्फेच देण्यात आली.
पुणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष पावसाळा तोंडावर येऊनही सुरू झाला नव्हता. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त दिल्यावर, जागे झालेल्या प्रशासनाने मंगळवारी हा कक्ष सुरू केला. याबाबत माहिती देताना अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप म्हणाले, ‘‘मुठा नदीत वीस हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडल्या नंतर नदीकाठच्या परिसरात तत्काळ अतिदक्षतेचा इशारा जाहीर केला जाणार आहे. यापूर्वी चाळीस हजार क्युसेक्स पाणी सोडल्यानंतर, हा इशारा दिला जात होता. नदीकाठच्या परिसरात पाणी घुसून दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यामध्ये महापालिकेचा पूरनियंत्रण कक्ष २४ तास सुरू असणार आहे. १५ क्षेत्रीय कार्यालय स्तरावरही नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. अग्निशमन दल आणि क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी, अशा एकूण २५ कर्मचाऱ्यांची टीम सज्ज ठेवण्यात येणार आहे.
एसएमएसद्वारे मिळणार अलर्ट
धरणांमधून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यानंतर, ज्या परिसरात पाणी घुसण्याची शक्यता आहे- त्या परिसरातील नागरिकांना तत्काळ ही माहिती मिळावी, यासाठी बल्क एसएमएसद्वारे अलर्ट देण्यात येणार आहे. हा अलर्ट संबंधित भागातील सोसायट्यांचे पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक, क्षेत्रीय कार्यालयाचे कर्मचारी, तसेच त्या परिसरातील काही संस्थांनाही पाठविले जाणार आहेत. या शिवाय त्या परिसरातील संस्था, तसेच मंडळांनाही याबाबतचे अर्लट पाठविले जाणार आहेत.
शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास अथवा नागरिकांना काही तक्रारी असल्यास, त्यांनी महापालिका क्षेत्रीय कार्यालय यांच्याशी संपर्क करावा. पूरनियंत्रण कक्षाचा २५५०६८००/१/२/३/४ हा क्रमांक चोवीस तास उपलब्ध असणार आहे. या शिवाय क्षेत्रीय कार्यालयांसाठीचे क्रमांकही लवकरच जाहीर केले जाणार असून, नागरिक १०१ या अग्निशमदलाच्या क्रमांकावरही संपर्क साधू शकतात.