सुटीत वाढलाय ‘डान्स मॅनिया’

By Admin | Updated: May 17, 2015 00:59 IST2015-05-17T00:59:39+5:302015-05-17T00:59:39+5:30

उन्हाळ्याच्या सुट्टीत शिबिरे किंवा क्रिकेटच्या क्लाससाठी पाठविण्यापेक्षा आपल्या मुलांना डान्सच्या क्लासला पाठविण्याचे प्रमाण लक्षणियरीत्या वाढले आहे.

'Dance Mania' | सुटीत वाढलाय ‘डान्स मॅनिया’

सुटीत वाढलाय ‘डान्स मॅनिया’

प्राची मानकर/प्रियांका लोंढे ल्ल पुणे
उन्हाळ्याच्या सुट्टीत शिबिरे किंवा क्रिकेटच्या क्लाससाठी पाठविण्यापेक्षा आपल्या मुलांना डान्सच्या क्लासला पाठविण्याचे प्रमाण लक्षणियरीत्या वाढले आहे. ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत ५० टक्क्यांहून अधिक पालक आपल्या मुलांना डान्सच्या क्लासला पाठवीत आहेत.
सुट्टीमध्ये मुले काय करतात, हे पाहण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने शहराच्या विविध भागांत सर्वेक्षण करण्यात आले. विविध आर्थिक आणि सामाजिक गटांतील २०० पालकांशी संवाद साधला. यामध्ये ५० टक्क्यांहून अधिक पालकांनी मुलांना डान्स क्लाससाठी पाठविले असल्याचे सांगितले. ३० टक्के पालक आपल्या मुलांना क्रिकेटच्या क्लासला पाठवीत असल्याचे दिसून आले आहे. हस्ताक्षर चांगले व्हावे यासाठी पूर्वी सुट्टीच्या दिवसांत मुलांना चित्रकलेच्या क्लासला पाठविले जात होते. मात्र, आता हे प्रमाण अवघे ७ टक्क्यांवर आले आहे. मुलांना सुट्टीमध्ये कोठेतरी अडकविण्यापेक्षा त्यांना मुक्तपणे खेळू देणेच योग्य असल्याचे मत १० टक्के पालकांनी व्यक्त केले आहे.
मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी पाठविता का? असा प्रश्न विचारला असता, अनेक पालकांनी सध्या मैदानेच उपलब्ध नसल्याने पाठविणार कोठे? असा सवाल केला. सध्या टी.व्ही.वर रिअ‍ॅलिटी शोमुळे मुलांना डान्सच्या क्लासला पाठविता का? असे विचारले असता, हे एक कारण आहेच, परंतु त्यापेक्षाही डान्समुळे मुलांच्या शरीराला शिस्त लागते. त्याचबरोबर चांगला व्यायामही घडतो, असे सांगितले.
तबला आणि हार्मोनियमपेक्षा सध्या गिटारच्या क्लासला अधिक मागणी असल्याचेही सर्वेक्षणात आढळून आले आहे. मात्र, याचे प्रमाण केवळ २ टक्के आहे.
डान्स क्लासला मुलांना पाठविण्यासाठी वयाचे बंधन नाही, हे देखील या पाहणीतून दिसून आले आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासून मुले डान्स शिकायला जातात.
त्यामध्ये सर्वांत जास्त पसंती ही बॉलिवूड आणि वेस्टन डान्सला
मिळत आहे. ११ ते २० वर्षे वयोगटातील मुले बॉलरूम, लासेन्स, सालसा, बेली डान्स, कन्टेपररी, ब्रेक डान्स, झूंबा, फ्री स्टाईल, अ‍ॅरोबिक्स, हिपपॉप अशा डान्सप्रकारांना पसंती देत आहेत.

चांगला डान्सर होईल
बहुतांश पालकांनी, आमच्या मुलांना डान्सचे अंग आहे, तो चांगला डान्सर होईल, असे वाटते. त्यामुळे डान्स क्लासला पाठविले, असे सांगितले. फक्त सुट्टीच नव्हे तर वर्षभर डान्स क्लाससाठी पाठविण्याचा विचार असल्याचेही बोलून दाखविले.

‘रिअ‍ॅलिटीज शो’चा प्रभाव
टीव्हीवरील वाढत्या रिअ‍ॅलिटी शोजचा प्रभाव आजच्या लहान मुलांवर पडताना दिसत आहे. आपला मुलगा अशा शोजच्या माध्यमातून टीव्हीवर चमकावा अशी पालकांचीदेखील इच्छा असते. त्यामुळे मुलांना सुट्ट्यांमध्ये डान्स क्लासला पाठविण्याचे प्रमाण वाढले आहे.

आमच्याकडे लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळे डान्स शिकायला येतात. या सगळ्यात लहान मुले जास्त आहेत. आमच्याकडे लासेन्स आणि बॉलरूम हे नृत्यप्रकार शिकविले जातात आणि मुलांना असे वेगळ्या प्रकारचे नृत्य शिकायला आवडत आहे, आणि यामध्येच त्यांना करिअर करण्याची इच्छा आहे.
- अंकिता रॉय, कोरिओग्राफर

आमची ४ वर्षांची मुलगी द्रिती टीव्ही शोमधील डान्स पाहून म्हणते, की मला पण असाच डान्स शिकायचाय. ते पाहून तसाच डान्स करण्याचा प्रयत्न करते, आता तिला सुट्टी लागली असल्याने घरात खूप कंटाळा येतो. म्हणून मला डान्स क्लास लावा, असा हट्ट ती करते. तिची आवड पाहून आम्ही तिला डान्स क्लास लावला आहे.
- भारती पुजारी, पालक

वाढत्या स्पर्धेचे प्रमाण पाहता मामाच्या गावी न जाता सुट्टीचा सदुपयोग व्हावा यासाठी सध्याचे पालक प्रयत्नशील असतात. शाळेत खूप अ‍ॅक्टिव्हीटज असल्या तरी आमच्या संस्थेत येणाऱ्या मुलांचा फिटनेसचा विचार करून हिपहॉप, बॉलिवूड डान्स, झांज अशी नृत्ये शिकविली जातात. कारण फिटनेससोबत मुलांना नृत्याचाही आनंद लुटता येतो.
- आरती कौशल, डान्सिंग कोर्स

सध्या मुलांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत. दररोज त्यांना मैदानावर घेऊन जाणेही शक्य नाही. त्यामुळे डान्स क्लास लावला आहे. त्यातून मुलांचा व्यायामही होईल. खेळाप्रमाणेच येथेही त्यांच्या नव्या ओळखी होतील. मित्रपरिवार वाढेल.
- रवींद्र गाडे, पालक

Web Title: 'Dance Mania'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.