कुकडी नदीवरील बंधारे कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:16 IST2021-05-05T04:16:04+5:302021-05-05T04:16:04+5:30
—————————— वडगाव कांदळी : जुन्नर तालुक्यातील कुकडी नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. पाण्याअभावी पिण्याच्या ...

कुकडी नदीवरील बंधारे कोरडे
——————————
वडगाव कांदळी : जुन्नर तालुक्यातील कुकडी नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. पाण्याअभावी पिण्याच्या पाण्याचा व जनावरांचा चाऱ्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. बंधारे गेले आठ ते दहा दिवसापासून कोरडे असल्याने शेतकऱ्यांना ' धरण उशाला कोरड घशाला' अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
येडगाव धरणापासून वैशाखखेडे, कांदळी, वडगाव कांदळी कोल्हापूर पध्दतीचे हे बंधारे चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहेत. पाटबंधारे विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे हे बंधारे सध्या कोरडे पडल्याचे दिसून येत आहे. या वर्षी चांगला पाऊस होऊनही शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे धरणाच्याजवळ हे बंधारे असूनही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वैशाखखेडे, कांदळी, वडगाव कांदळी या बंधाऱ्यामधून नगदवाडी, कांदळी, पिंपळवंडी, पिंपरीपेंढार, वडगाव कांदळी, साळवाडी, आळे या गावांना उपसा सिंचन योजनेद्वारे शेतीला पाणी पुरविण्याचे महत्त्वाचे साधन झाले आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून उपसा जलसिंचन योजना राबविल्या आहेत. वडगाव कांदळी, कांदळी वैशाखखेडे या तीन बंधाऱ्यातून सुमारे २५० ते ३०० विद्युतमोटरच्या साहाय्याने शेतीला पाणीपुरवठा होत असतो. गेल्या आठ दिवसापासून बंधाऱ्यातील पाणी संपल्याने नदीपात्रातील बरेचसे विद्युत पंप बंद असल्याने शेतकऱ्यांपुढे जनावरांच्या चार्याचा व पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. पाटबंधारे विभागाने ताबडतोब या बंधाऱ्यात पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
—-
चौकट
उन्हाळ्यातही अवकाळीने दिलासा
भर उन्हाळ्यात सध्या अवकाळी पाऊस पडत असल्याने बंधाऱ्यातील पाणी संपूनही या अवकाळी पावसाने शेती पिकांची व चारापिकांची पाण्याची आठ दिवसांची व्यवस्था झाली आहे. जर आठ दिवसात बंधारे भरले नाही तर शेतकऱ्यांना हातातोंडाशी आलेली चारा पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
—
कोट
गेल्या आठ दिवसापासून नदीवरील मोटारी पाणी नसल्याने बंद आहेत. उन्हाळ्यामुळे विहिरीही कोरड्या असल्यामुळे पूर्णपणे बांधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. बंधारेही कोरडे पडल्याने जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.आठ दिवसात नदीला पाणी आले नाही तर चारापिके पूर्णपणे जळून जातील.
- नामदेव पाचपुते,
शेतकरी, वडगाव कांदळी.
—-
फोटो क्रमांक: ०३ वडगाव कांदळीधरण
फोटो ओळ : वडगाव कांदळी (ता. जुन्नर ) येथील कुकडी नदीवरील कोरडा पडलेला के. टी. बंधारा
—