निमोणे परिसरात डासांचा प्रादुर्भाव
By Admin | Updated: November 9, 2015 01:31 IST2015-11-09T01:31:02+5:302015-11-09T01:31:02+5:30
येथील ग्रामपंचायतीच्या सांडपाण्याच्या व्यवस्थापनाअभावी पाण्याची डबकी साचली आहेत. यावर डासांचा प्रादुर्भाव झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

निमोणे परिसरात डासांचा प्रादुर्भाव
निमोणे : निमोणे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या सांडपाण्याच्या व्यवस्थापनाअभावी पाण्याची डबकी साचली आहेत. यावर डासांचा प्रादुर्भाव झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
निमोणे हे मोठ्या लोकवस्तीचे गाव आहे. गावच्या काही भागांमध्ये विशेषत: दलितवस्त्यांमध्ये सांडपाण्याचे अजिबात व्यवस्थापन नाही. या नियोजनाअभावी घराघरांतून निघणारे पाणी थेट रस्त्यावर येते. त्याचप्रमाणे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खासगी, तसेच सार्वजनिक नळांना बंद करण्याची व्यवस्था नाही.
काही सार्वजनिक नळ कोंडाळी अशी आहेत, की खासगी नळजोड असल्याने त्यावर कोणी पाणी भरत नाही. मात्र, वर्षानुवर्षे हे नळ चालू असल्याने यातून पाण्याचा अपव्यय तर होतोच, शिवाय हे पाणी थेट रस्त्यावर येऊन डबकी तयार झालेली आहेत.
यासंदर्भात सरपंच वर्षाराणी थोरात यांच्याशी संपर्क साधला असता, काही तरी उपाययोजना करू, असे सांगितले. येथील ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक गेल्या दोन महिन्यांपूर्वी झाली आहे. बारा सदस्यांचे कार्यकारी मंडळ आहे. सरपंच, उपसरपंचांसह किमान आठ सदस्य वाड्या-वस्त्यांवर राहणारे असल्याने गावातील मूलभूत समस्यांची प्रत्यक्ष झळ त्यांना बसत नसल्याने या समस्या कायम आहेत.