कांदा, टोमॅटो पिकांचे नुकसान
By Admin | Updated: March 14, 2015 23:37 IST2015-03-14T23:37:36+5:302015-03-14T23:37:36+5:30
गारांचा मुसळधार अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे कांदा, गहू, टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसल्याचा अंदाज व्यकत होत आहे.

कांदा, टोमॅटो पिकांचे नुकसान
रांजणगाव गणपती : पिंप्री दुमाला, निमगाव म्हाळुंगी, रांजणगाव गणपती, कोंढापुरी (ता. शिरूर) परिसरात मेघगर्जनेसह गारांचा मुसळधार अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे कांदा, गहू, टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसल्याचा अंदाज व्यकत होत आहे.
निमगाव म्हाळुंगी परिसरात दि. १३ रोजी सायंकाळी पावसाची हजेरी लावली होती; तर दि. १४ रोजी दु.४ ते ४.३० दरम्यान परिसरातील गावांमध्ये अचानक सुरू झालेल्या गारांच्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडाली. गारांचा पाऊस पडल्याने शेतात उभे असलेले गव्हाचे पिक भुईसपाट झाल्याने काढणीस आलेल्या गव्हाचे मोठे नुकसान झाले आहे. तर, कांद्यालाही गारांचा फटका बसला आहे.
निमगाव म्हाळुंगी येथील संजय लांडगे यांच्या शेतात असलेल्या टोमॅटो पिकाचेही अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे .पिंप्री दुमाला परिसरात मोठ्या असलेल्या कांदा, गहू व डाळिंब, सीताफळ, पपई, आंबा यांसारख्या फळबागेला गारांसह पडलेल्या अवकाळी पावसाने फटका बसल्याने मोठे नुकसान झाल्याचे रामदास खेडकर व शासनाच्या शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते, प्रगतिशील शेतकरी शिवाजीराव चिखले यांनी सांगितले.
आंब्याला आलेला काही मोहर १५ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने गळाला होता. आताच्या गारांसह पडलेल्या अवकाळी पावसाने आंब्याला आलेल्या लहान कैऱ्या गळून पडल्याने फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
शासनाने त्वरित शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पिकाच्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने झालेली नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी रांजणगावच्या सरपंच स्वाती पाचुंदकर,निमगावचे सरपंच अर्जुन नवले यांसह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
(वार्ताहर)
४शिरूर : शहर व परिसरात संध्याकाळी गारपीट झाली. अचानक गारा कोसळू लागल्याने नागरिकांची धांदाल उडाली. लहान मुले गारा वेचून खाताना दिसून आले. सुदैवाने तालुक्यात गारपीट झाली नाही.
४नाहीतर आधीच मागील पंधरवड्यात अवकाळी पावसाने पिचलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा मोठा फटका बसला असता. शेतात गारपीट झाल्यावर किती नुकसानीला सामोरे जावे लागते. मात्र, शहरात गारा पडल्यावर नागरिक त्याचा आनंद लुटताना दिसत होते.
४आज सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान पाऊस सुरू झाला आणि काही मिनिटांतच गारा कोसळू लागल्या. गारा पडतात म्हटल्यावर लहान मुले तसेच महिलावर्गही आपापल्या गॅलरीत, टेरेसवर गारा गोळा करून खाताना दिसून आले.
४गारा पडताना रस्त्यावर असणाऱ्या नागरिकांची मात्र धांदल उडाली. गारा डोक्याला लागत होत्या. तालुक्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाल. पिंप्री दुमाला परिसरातही गारामुळे आंब्याचे नुकसान झाले.
४ मागील पंधरवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने गहू, कांदा, हरभरा व भाजीपाला पिकांचे ४७१ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. अशात आता गारपीट झाल्यास आणखी नुकसानीस सामोरे जावे लागेल, याची शेतकऱ्यांत भीती आहे.
पिंपरी सांडस : शुक्रवारी झालेल्या गारपिटीने हवेलीच्या पूर्व भागाचे बरेच नुकसान झाले. त्यामध्ये पिंपरी सांडस, न्हावी सांडस, सांगवी सांडस, अष्टापूर फाटा याठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आमदार बाबूराव पाचर्णे यांनी गारपीटग्रस्त गावांना भेट दिली. त्या म्हणाले की, विधानसभेत मागणी मांडून सर्व पिकांचे, तसेच पॉलिहाऊसचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार हवेली यांना दिले आहेत.
पावसामुळे वीजपुरवठा खंडित; आदिवासी पट्टा अंधारात,
तळेघर : गेले चार दिवस वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वीजपुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊन आंबेगाव तालुक्याचा पश्चिम आदिवासी भाग गेले चार दिवस अंधारात आहे.
बुधवारपासून (दि. ११) आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सुरुवात केली.
डिंभे ते श्री क्षेत्र भीमाशंकर व डिंभे ते आहुपे या भागामध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. महावितरण कंपनीचे अधिकारी गेले चार दिवस या परिसरामध्ये फिरून वीजपुरवठ्यामध्ये झालेल्या बिघाडाची कसून चौकशी करीत असून त्यांच्या हाती कोणत्याही प्रकारचे यश आले नाही.
सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. या भागातील पोखरी हे दहावीचे परीक्षा केंद्र आले.
या परिसरातील सर्व शाळांचे हे केंद्र असल्यामुळे गोहे, असाणे, तेरुंगण, राजपूर, आहुपे अशा दूरवर असणाऱ्या शाळेतील विद्यार्थी पोखरी या ठिकाणी मुक्कामी आहेत. या भागात विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
(वार्ताहर)