पालखी मार्गाचे डांबरीकरण करा
By Admin | Updated: November 14, 2016 02:17 IST2016-11-14T02:17:47+5:302016-11-14T02:17:47+5:30
नीरा शहरातून जाणाऱ्या पालखी मार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमधून आता नीरा शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

पालखी मार्गाचे डांबरीकरण करा
सोमेश्वरनगर : नीरा शहरातून जाणाऱ्या पालखी मार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमधून आता नीरा शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्हा बांधकाम विभागाने हे खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. खड्ड्यांची डागडुजी करण्यापेक्षा जेजुरी ते लोणंद या संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण पुन्हा करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
हा मार्ग दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग असला, तरी हा महामार्ग वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. हडपसर ते जेजुरी रस्त्याचे काम आजही रखडले आहे. सासवड-जेजुरीदरम्यान खळद ग्रामस्थांनी केलेल्या मागण्यांकडे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे काही ग्रामस्थ कोर्टात गेले आणि हे काम थांबले.
मात्र, वाहनचालकांना व पयार्याने लोकांना याचा फार मोठा फटका बसला आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा हा मार्ग असला, तरी दर वर्षी केवळ थोड्याफार डागडुजीशिवाय ठोस असे कोणतेच काम या रस्त्यावर गेल्या आठ वर्षांत झाले नाही.
जेजुरी ते नीरादरम्यान असलेल्या मार्गावर तर गेली १० ते १५ वर्षांत कोणतेही काम करण्यात आले नाही. त्यामुळे हा मार्ग अपघाताचा सापळाच बनला आहे. दौंडज खिंडीपासून पुढे नीरा नदीपर्यंत खड्ड्यांनी रस्त्याची चाळण केली आहे. मध्यंतरी बांधकाम विभागाने वरवरची मलमपट्टी करून खड्डे बुजवले खरे ,पण खड्डे बुजवताना बुजवलेल्या ठिकाणी चढ निर्माण झाले आहेत.