कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील फरशी ओढ्याजवळील वाडेगाव फाटा येथे सायकलस्वाराला ट्रकने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला असून, अपघातानंतर ट्रकचालक पळून जात असताना ग्रामस्थांनी पाठलाग करून त्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
याबाबत शिकापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८.१५ वा.चे सुमारास फरशीओढा एक इसम सायकलवर नगर बाजूकडून पुण्याकडे जात असताना त्यास एका ट्रकने (एम.एच १७ के. ९९९७) पाठीमागून धडक दिल्याने तो खाली पडून त्याच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने तो जागीच मृत झाला. अपघातानंतर ट्रक तसाच पुणे बाजूकडे निघून चालला असता फिर्यादी किरण शिवदास व अजित वाघुले यांनी त्याचा पाठलाग करून त्यास छत्रपती संभाजी हायस्कूल येथे पकडले व शिक्रापूर पोलिसांच्या हवाली केले. मयत इसमाचे नाव चंद्रकांत बाजीराव थिटे (वय ४८ वर्षे, रा. सर्वे ३८/३/१ गारमळा कॉलनी, रहाटणी, पिंपरी, पुणे १७) असे असल्याचे व ट्रकचालक इब्राहिम अल्लाबक्ष खान (वय ३२ वर्षे, रा. सर्वे नं. २१२, घर नं. ६२८, गल्ली नं. ५ नया आझादनगर, मालेगाव, जि. नाशिक) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करीत आहे.