सध्याची कपात सुरूच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2016 03:22 IST2016-07-05T03:22:25+5:302016-07-05T03:22:25+5:30
पाऊस सुरू झाल्यामुळे पुण्याची वाढीव पाणीकपात टळली असली, तरीही दिवसाआड पाणीपुरवठा होणारी सध्याची कपात सुरूच राहणार आहे. ज्या धरणांमधून पाणी घेतले जाते त्यात

सध्याची कपात सुरूच राहणार
पुणे : पाऊस सुरू झाल्यामुळे पुण्याची वाढीव पाणीकपात टळली असली, तरीही दिवसाआड पाणीपुरवठा होणारी सध्याची कपात सुरूच राहणार आहे. ज्या धरणांमधून पाणी घेतले जाते त्यात २९ टीएमसी पाणी साठल्याशिवाय रोज पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ईदनिमित्त ६ व ७ जून असे सलग दोन दिवस पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी दिली. पाण्यासंबंधीचे निर्णय घेण्याचा अधिकार महापालिकेला नाही, या पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलेल्या वक्तव्याबाबत महापौरांना विचारले असता त्यांनी पाण्याबाबतचे निर्णय घेण्याचा अधिकार महापालिकेला आहेच असे प्रत्युत्तर दिले. पुणेकरांचे हित महत्त्वाचे असल्याने असे निर्णय महापालिकाच घेईल, असे महापौरांनी ठणकावून सांगितले. पाऊस सुरू झाला असला तरीही तो समाधानकारक आहे, असे म्हणता येत नाही तोपर्यंत सध्याची पाणीकपात सुरूच राहील, असे ते म्हणाले.
साधारण आॅगस्टपर्यंत ही धरणे पूर्ण भरतात. अद्याप ती तशी भरली नसल्याने दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे, असे महापौरांनी सांगितले. जुलैमध्येच धरणे ओव्हरफ्लो झाली तर चांगलेच आहे, मात्र तोपर्यंत रोज पाणी देण्याचा निर्णय घेणार नाही, असे ते म्हणाले. ईदनिमित्त ६ व ७ जुलै रोजी सलग दोन दिवस पाणीपुरवठा करण्यात येईल.
वाढीव पाणीकपातीच्या निर्णयासाठी ८ जुलैला आयोजिण्यात आलेली बैठक रद्द करण्यात आली आहे. पावसाचा रागरंग पाहून पुढची बैठक आयोजिण्यात येईल, अशी माहिती महापौरांनी दिली.
धरणक्षेत्रात पाऊस
खडकवासला, वरसगाव, टेमघर व पानशेत या धरणसाखळीतून पुण्याचा पाणीपुरवठा केला जातो. या चारही धरणांच्या लाभक्षेत्रात चांगला पाऊस सुरू झाला असून दोन दिवसांच्या पावसात चारही धरणांचा मिळून एकूण पाणीसाठा ४.४० टीएमसी इतका झाला आहे. या सर्व धरणांची एकूण क्षमता २९.१५ टीएमसी इतकी आहे.
सलग तिसऱ्या दिवशी संततधार
पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. रविवारी रात्रभर जोरदार बरसल्यानंतर सोमवारी सकाळपासून पावसाची तीव्रता घटली. आज दिवसभर थांबून-थांबून पाऊस पडत होता. कधी जोरदार सरी, तर कधी हलका-मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता. पुढील २४ तासांत शहरात पावसाची तीव्रता कमी होणार असून अधून-मधून पावसाच्या सरी बरसतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. शनिवारी आणि रविवारी शहरात जोरदार पाऊस पडला. रविवारी रात्रभरही जोरदार पाऊस पडत होता. मात्र सोमवारी सकाळी पावसाची तीव्रता कमी झाली. रविवारी सकाळी साडेआठ ते सोमवारी सकाळी साडेआठ या वेळेत ४२.९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. सोमवारी सायंकाळी साडेपाच या वेळेत ५ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. अधून-मधून शहरात येणाऱ्या जोरदार सरींमुळे अनेक रस्त्यांवर पाणी साठले होते. हंगामात पहिल्यांदाच पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहराची जीवनवाहिनी असलेली मुठा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.