सांस्कृतिक राजधानीचे बिरुद टिकणार?

By Admin | Updated: February 17, 2017 05:13 IST2017-02-17T05:13:43+5:302017-02-17T05:13:43+5:30

महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक राजकीय पक्ष मतदारराजाला खूष करण्यासाठी सरसावला आहे. ‘सांस्कृतिक राजधानी’

Cultural capital will remain birud? | सांस्कृतिक राजधानीचे बिरुद टिकणार?

सांस्कृतिक राजधानीचे बिरुद टिकणार?

पुणे : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक राजकीय पक्ष मतदारराजाला खूष करण्यासाठी सरसावला आहे. ‘सांस्कृतिक राजधानी’ अशी शहराची ओळख टिकविण्याच्या दृष्टीने कंबर कसल्याचे चित्र सर्व प्रमुख पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यांमधून उभे केले आहे. प्रत्यक्षात, नाट्यगृहांची दुरवस्था, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तारखा काढून घेण्याचे प्रकार पाहता आणि शहराच्या सांस्कृतिक धोरणाचा उडालेला बोजवारा पाहता, सांस्कृतिक राजधानी हे बिरुद टिकून राहणार की ही ओळख पुसली जाणार, असा प्रश्न मतदारांकडून उपस्थित केला जात आहे.
सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्याला कलेचा समृद्ध वारसा लाभला आहे. दिग्गज कलावंत आणि साहित्यिकांनी पुण्याचे नाव देशाच्याच नव्हे, तर राज्याच्या नकाशावर कोरले. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये शहराला सांस्कृतिक मागासलेपण आले आहे. हीच ओळख आगामी वर्षांमध्ये पुसली जाईल की काय, अशी भीतीही व्यक्त होताना दिसत आहे. शहरातील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय घडामोडींचे आगार असलेल्या महापालिकेने आजवर सांस्कृतिक समृद्धीच्या दृष्टीने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत.
भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपल्या जाहीरनाम्यांमधून नवीन नाट्यगृहांची उभारणी, महापालिकेमध्ये स्वतंत्र सांस्कृतिक विभाग, सांस्कृतिक दूत, कलाकारांना हक्काचे व्यासपीठ अशा आश्वासनांचे आकर्षक मनोरे उभारले आहेत. पण, ही आश्वासने प्रत्यक्षात उतरणार की हवेतच विरून जाणार, याबाबत मात्र साशंकता व्यक्त केली जात आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Cultural capital will remain birud?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.