संकष्टी चतुर्थीनिमित्त मोरगावला भाविकांची गर्दी
By Admin | Updated: June 6, 2015 22:20 IST2015-06-06T22:20:02+5:302015-06-06T22:20:02+5:30
अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथील मयूरेश्वर मंदिरात काल संकष्टी चथुर्तीनिमित्त पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.

संकष्टी चतुर्थीनिमित्त मोरगावला भाविकांची गर्दी
मोरगाव : अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथील मयूरेश्वर मंदिरात काल संकष्टी चथुर्तीनिमित्त पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. पहाटे पाच ते रात्री उशिरापर्यंत सुमारे ५० हजार भाविकांनी ‘श्रीं’चे दर्शन घेतले.
शुक्रवारी (दि.५) चतुर्थीनिमित्त पहाटे प्रक्षाळ पूजा झाल्यानंतर भक्तांसाठी मुख्य दरवाजा खुला करण्यात आला.
यानिमित्ताने पेठेतील दुकाने हार, दूर्वा, श्रींच्या प्रतिमांनी सजली होती. शाळा सुरू होण्यासाठी अवघा आठवडा राहिलेला असतानाही सुट्यांमुळे गर्दीचा ओघ जास्त जाणवत होता. सकाळी ७ वाजता सालकरी ढेरे यांची मानाची पूजा झाल्यानंतर गर्दीचा ओघ वाढत गेला. दुपारी १२ वाजता महापूजा झाल्यानंतर देवस्थानातर्फे अन्नछत्र सुरू करण्यात आले. याचा लाभ अनेक भक्तांनी घेतला. संभाव्य गर्दी लक्षात घेता, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामार्फत सहायक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.