पुस्तकविक्रीची कोटीच्या कोटी उड्डाणे

By Admin | Updated: January 19, 2016 01:44 IST2016-01-19T01:44:42+5:302016-01-19T01:44:42+5:30

साहित्य संमेलनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथदालनात पुस्तके खरेदीसाठी वाचकांनी पहिल्या दिवसांपासून गर्दी केली. शेवटच्या तीन दिवसांत तर खरेदीचा विक्रम प्रस्थापित झाला

Crores of books worth crores of books | पुस्तकविक्रीची कोटीच्या कोटी उड्डाणे

पुस्तकविक्रीची कोटीच्या कोटी उड्डाणे

हणमंत पाटील, ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी)
साहित्य संमेलनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथदालनात पुस्तके खरेदीसाठी वाचकांनी पहिल्या दिवसांपासून गर्दी केली. शेवटच्या तीन दिवसांत तर खरेदीचा विक्रम प्रस्थापित झाला. संमेलनाच्या चार दिवसांत पाच कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज संयोजकांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय साहित्य संमेलनात साहित्यिकांप्रमाणेच प्रकाशकांची चांगली बडदास्त ठेवण्यात आली होती. संत मोरया गोसावी प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना प्रशस्त जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथदालन उभारण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रासह, कर्नाटक, मध्यप्रदेश व आंध्र प्रदेश येथील सुमारे ४०० हून अधिक प्रकाशकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये खासगी प्रकाशक, शासकीय, महापालिका व धार्मिक पीठांची ग्रंथ दालने होती.
प्रकाशकांच्या स्टॉलभोवती पडदे, मधल्या जागेत कार्पेट, स्वच्छता ठेवण्यात आली. दोन्ही स्टॉलमध्ये प्रशस्त जागा असल्याने साहित्यप्रेमींची खरेदीसाठी गर्दी होऊनही गोंधळ उडाला नाही. धार्मिक ग्रंथ, ऐतिहासिक पुस्तके, सामाजिक व आरोग्य विषयक पुस्तकांची विविधता दिसून आली. कथा, कादंब-या, काव्यसंग्रह, बालगिते, व्हिडिओ व अ‍ॅडिओ सीडी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. प्रसिद्ध लेखकांच्या पुस्तकांना मागणी सर्वाधिक मागणी होती. तसेच गाण्यांच्या सीडीही ग्रंथदालनात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यालाही प्रतिसाद मिळाला.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ग्रंथप्रदर्शनाप्रमाणे पिंपरी-चिंचवडच्या साहित्य संमेलनात प्रकाशकांना सुविधा देण्यात आली. आयोजकांनी प्रकाशकांना आवश्यक व दर्जेदार सुविधा दिल्या. त्यामुळे विक्रमी पुस्तक विक्री होऊ शकली.
- बाबूराव मैंदर्गीकर, प्रकाशक
आयोजकांनी प्रकाशकांना भोजन, पाणी, स्वच्छतागृह अशी ‘ए वन’ सुविधा दिली होती. तसेच, वाचकांना पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातून येण्यासाठी वाहनांची सुविधा केली. त्यामध्ये मध्यमवर्गीय, तरुण, कॉलेजचे युवक व शाळेच्या विद्यार्थीचा सहभाग होता. एकाच ठिकाणी विविध प्रकाशक, लेखकांची पुस्तके असल्याने वाचकांना खरेदीसाठी वाव मिळाला. त्यामुळे चार दिवसांत सुमारे साडेचार ते पाच कोटींची विक्री झाली आहे.- अनिल कुलकर्णी, समन्वयक व प्रकाशक.

Web Title: Crores of books worth crores of books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.