धरणातील पाणी प्रदूषित केल्यास फौजदारी
By Admin | Updated: March 22, 2016 01:57 IST2016-03-22T01:57:45+5:302016-03-22T01:57:45+5:30
धूलिवंदनानिमित्त खडकवासला धरण परिसरात रंग खेळणे, पाण्यात उतरणे असे प्रकार करून पिण्याचे पाणी दूषित करण्याचा प्रयत्न नागरिकांकडून होऊ शकतो

धरणातील पाणी प्रदूषित केल्यास फौजदारी
पुणे : धूलिवंदनानिमित्त खडकवासला धरण परिसरात रंग खेळणे, पाण्यात उतरणे असे प्रकार करून पिण्याचे पाणी दूषित करण्याचा प्रयत्न नागरिकांकडून होऊ शकतो. यामुळे हवेली प्रांत अधिकारी स्नेहल बर्गे यांनी खडकवासला धरणातले पाणी प्रदूषित करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
बर्गे यांनी आपल्या आदेशात म्हटले की, खडकवासला धरणातील पाणी पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. सध्या दुष्काळामुळे हा पाणीसाठा अत्यल्प असल्याने सध्या दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर धूलिवंदनानिमित्त नागरिकांकडून खडकवासला धरण परिसरात रंग खेळणे, पाण्यात
उतरणे असे प्रकार केले जातात.
त्यामुळे अपायकारक रंग तसे वस्तू मिसळून पाणी प्रदूषित होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका
निर्माण होऊ शकतो. यामुळे खडकवासला धरणाचे पाणी प्रदूषित होईल, अशी कोणतीही कृती
करण्यास फौजदारी प्रकिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये २० ते २७ मार्चपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. पाणी प्रदूषित करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश बर्गे यांनी दिले.