चाकण : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणाची एका महिलेने तक्रार दाखल केल्याने चिडलेल्या तीन जणांनी तक्रारदार महिलेचे कोयत्याचा धाक दाखवून अपहरण केले. त्यानंतर कुरुळी (ता.खेड) येथील एका घरात सात तरुणांनी संगनमत करून संबंधित महिलेस एका खोलीत कोंडून ठेवत शिवीगाळ - दमदाटी केली. यादरम्यान एकाने संबंधित महिलेवर चारवेळा बलात्कार केला. सदर घटना ( ५ ते ७ ) जून या दोन दिवसांमध्ये घडली आहे.
याप्रकरणी बलात्कार करणारा आरोपी गणेश ऊर्फ गणी रामचंद्र नाणेकर (रा. नाणेकरवाडी, ता. खेड) याच्यासह त्याचे साथीदार बारकू रमाजी गोसावी (रा. कुरुळी), सुभाष सुतार (रा. नाणेकरवाडी), प्रज्वल जाधव, यश शिंदे, ओम नाणेकर आणि रणजित येरकर अशा सात जणांवर महाळुंगे एमआयडीसी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी गणेश ऊर्फ गणी नाणेकर याच्याविरुद्ध तिने आळंदी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. यामुळे चिडून आरोपी गणेश नाणेकर, बारकू गोसावी व सुभाष सुतार यांनी पीडित महिलेस मरकळ येथील राहत्या घरातून कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने कुरुळी येथील बारकू गोसावी याच्या घरी आणले. तिथे आरोपी गणेश नाणेकर व त्याच्या सात साथीदारांनी पीडित महिलेस कोंडून ठेवले. यादरम्यान गणेश नाणेकर याने पीडित महिलेशी चार वेळा शरीरसंबंध ठेवून तिला मारहाण व शिवीगाळ केली. पुन्हा पोलिसांत तक्रार केली तर जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.