राजकारणात गुन्हेगारी

By Admin | Updated: September 5, 2015 03:21 IST2015-09-05T03:21:42+5:302015-09-05T03:21:42+5:30

राजकीय व्यक्ती, नगरसेवकांवरील खुनी हल्ल्याच्या घटना गेल्या काही वर्षांत वाढत चालल्या आहेत. खुनी हल्ल्यात आत्तापर्यंत चार नगरसेवकांचा बळी गेला.

Crime in politics | राजकारणात गुन्हेगारी

राजकारणात गुन्हेगारी

संजय माने , पिंपरी
राजकीय व्यक्ती, नगरसेवकांवरील खुनी हल्ल्याच्या घटना गेल्या काही वर्षांत वाढत चालल्या आहेत. खुनी हल्ल्यात आत्तापर्यंत चार नगरसेवकांचा बळी गेला. त्यामुळे संतांची नगरी असलेल्या शहराच्या राजकारणाचे गुन्हेगारीकरण होऊ लागले आहे.
पिंपरी-चिंचवड औद्यागिक क्षेत्रात कामगार वर्गाचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य असल्याने हे शहर कामगारनगरी म्हणून नावारूपाला आले. श्रीक्षेत्र आळंदी, देहू आणि गणेश भक्त मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली संतभूमी सुरुवातीला शांत होती; परंतु पैशासाठी राजकारण, राजकारणातून पैसा यासाठी वाट्टेल ते करण्यापर्यंतची मजल गाठली. गेल्या काही वर्षात शहरातील राजकारणात गुन्हेगारीचा शिरकाव झाला आहे. त्याचा प्रत्यय पदोपदी येऊ लागला आहे.
शहरातील गुन्हेगारी टोळ्यांतील गुंड पुण्यातील अथवा बाहेरील कोणत्या ना कोणत्या टोळीशी संलग्न आहेत. स्थानिक पातळीवरही काही टोळ्या सक्रिय आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नगरसेवकांवर हल्ले होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. अद्यापही घडत आहेत. गुन्हेगारी कारवायांशी सुतराम संबंध नसलेल्या भाजपचे तत्कालीन शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांच्यासारख्याचाही हल्ल्यात नाहक बळी गेला आहे.
अशिक्षित नगरसेवकही विविध मार्गांनी अधिकाधिक पैसे कमाविण्याचा प्रयत्न करतात. कोणी ठेकेदारीत भागीदारी, तर कोणी अवैध धंद्यात सहभाग देतात. त्यांचा कोणाशी संबंध येतो, ते कोणत्या प्रकारचे काम करतात, याबद्दल सर्वसामान्य अनभिज्ञ असतात. अधिक पैसे मिळविण्यासाठी ते जे काही करतात, त्याचे पडसाद वेळोवेळी उमटत असतात. कधी हल्ल्याच्या स्वरूपात, तर कधी वेगळ्या स्वरूपात त्यांचे नाव चर्चेत येते. त्या वेळी खरे स्वरूप उघड होते. आपल्या निकटवर्तीयांना महापालिकेतील कामाचा ठेका मिळवून देण्यासाठी स्पर्धेतील अन्य ठेकेदारांना दमदाटी करणारे, त्यांच्या अंगावर धावून जाणारे नगरसेवकही महापालिकेत आहेत.

Web Title: Crime in politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.