गुन्हे शाखेने जप्त केले साडेबारा लाखांचे अफीम : तीन अटकेत
By Admin | Updated: March 22, 2017 19:56 IST2017-03-22T19:56:09+5:302017-03-22T19:56:09+5:30
अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी आलेल्या तिघाजणांना गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले आहे

गुन्हे शाखेने जप्त केले साडेबारा लाखांचे अफीम : तीन अटकेत
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 22 - शहरात अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी आलेल्या तिघाजणांना गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले आहे. मुळच्या राजस्थानच्या तरुणांकडून तब्बल साडेबारा लाखांचे 5 किलो अफिम जप्त करण्यात आल्याची माहिती उपायुक्त पी.आर. पाटील आणि सहाय्यक आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली. यामागे मोठे रॅकेट कार्यरत असून, मुख्य सुत्रधाराचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केल्याचेही पाटील यांनी सांगितले.
राणा सोनाराम पटेल (वय २३), रूपाराम बहेराराम पटेल (वय २५) आणि सर्व्हन केवलराम पटेल (वय २४, तिघे रा. जोधपुर, राजस्थान) अशी अटक आरोपींची नावे आहेत. रास्ता पेठेतील केईएम हॉस्पिटलजवळील एक्सेल लॉजमध्ये तिघेजण उतरले असून त्यांनी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ सोबत आणल्याची माहिती गुन्हे शाखेचे शैलेश जगताप यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी लॉजमधील खोली क्रमांक १०३ वर आज पहाटेच्या सुमारास छापा टाकला. तिघांना ताब्यात घेऊन खोलीची झडती घेण्यात आली. त्यावेळी अफीन नावाच्या अंमली पदार्थाच्या १ किलोच्या ५ पिशव्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली असून, आरोपींना पुढील तपासासाठी समर्थ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
राणा आणि सर्व्हन हे दोघे जोधपूर जिल्ह्यात शेती करतात. तर रुपाराम हा एका मेडिकल दुकानामध्ये काम करतो. आरोपी केवळ माल पोचवण्याचे काम करीत असून, टोळीचा म्होरक्या वेगळाच आहे. त्याने या तिघांना काही रक्कम देऊन पुण्यात पाठवल्याचे समोर आले आहे. या मुख्य सुत्रधाराचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे अतिरीक्त आयुक्त (प्रभारी) दीपक साकोरे, उपायुक्त पी.आर. पाटील, सहाय्यक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, यशवंत आंब्रे, शैलेश जगताप, राहुल घाडगे, हरिभाऊ रणपिसे, विनायक जोरकर, अजय भोसले, विनोद साळुंके, परवेज जमादार, मल्लिकार्जुन स्वामी, विठ्ठल बंडगर आणि धनाजी पाटील यांच्या पथकाने केली.
पथकाची अंमली पदार्थ विरोधी कारवाई
पोलीस ठाणे किंमतपदार्थ
सिंहगड रोड ५३ लाखहेरॉईन
विमानतळ ५ लाख ९ हजार एम.डी. (मेफेड्रॉन)
बंडगार्डन २ लाख ९७ हजार कोकेन
समर्थ १२ लाख ५० हजार अफिम
एकुण ७३ लाख ५७ हजार