अधीक्षक अभियंत्यासह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: May 19, 2015 01:05 IST2015-05-19T01:05:33+5:302015-05-19T01:05:33+5:30
प्रकल्पप्रमुख संदीप साळवी, ठेकेदार रघुनाथ महाबळ यांच्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधीक्षक अभियंत्यासह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा
पुणे : सफाई कामगारांना साबण, गमबूट, हातमोजे, मास्क अशा सुविधा न पुरविता त्यांना मलविसर्जनयुक्त पाण्यात काम करण्यास भाग पाडल्याप्रकरणी महापालिकेचे तत्कालीन भांडारप्रमुख व सध्याचे विद्युत अधीक्षक श्रीनिवास कंदुल, प्रकल्पप्रमुख संदीप साळवी, ठेकेदार रघुनाथ महाबळ यांच्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रार निवारण समितीचे सदस्य सतीश लालबिगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, द प्रोव्हिबिशन अॅक्ट एम्प्लॉयमेंट अॅज मॅन्युअल स्कॅवेजर्स अॅन्ड देअर रिहॅबिलिटेशन अॅक्ट २०१३ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव पार्क येथील भैरोबा पंपिंग स्टेशन येथील मलनिस्सारण प्रकल्प ठेकेदारी पद्धतीने अनेक वर्षांपासून ठेकेदार रघुनाथ महाबळ हे चालवीत आहेत. या प्रकल्पावरील कर्मचाऱ्यांना साबण, गमबूट, हातमोजे, युनिफॉर्म इत्यादी सुविधा महापालिकेने पुरविल्या नाहीत. ते सातत्याने मलविसर्जनयुक्त पाण्यात अनेक वर्षांपासून काम करीत असूनही त्यांच्याकडे मनपा अधिकारी व ठेकेदारांनी दुर्लक्ष केले आहे.
सफाई कर्मचारी आयोगाकडे यासंदर्भात भारतीय कर्मचारी संघटनेच्या वतीने तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. याची दखल घेऊन आयोगाने कौन्सिल हॉल येथे वारंवार बैठका घेतल्या. आयोगाच्या सदस्या डॉ. लता ओमप्रकाश महातो यांना मनपा अधिकाऱ्यांकडून खोटी माहिती देण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांना सर्व साधने व योग्य वेतन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रकल्प बंद असल्याने कर्मचारी कार्यरत नसल्याची माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)
1डॉ. लता महातो यांनी १० मे रोजी अचानक या प्रकल्पास भेट दिली, त्या वेळी प्रत्यक्षात प्रकल्प चालू होता. सफाई कर्मचारी मलमिश्रित पाण्यात काम करीत असल्याचे त्यांना आढळून आले.
2कर्मचाऱ्यांशी डॉ. महातो यांनी चर्चा केली, त्या वेळी महापालिकेने कोणत्याही सुविधा, साधने पुरविली नाहीत तसेच वेतन कायद्याप्रमाणे वेतनही दिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले.
3या वेळी महातो यांनी श्रीनिवास कंदुल यांना फोन केला असता त्यांनी फोन घेतला नाही व त्या ठिकाणी जाण्याचे टाळले. यामुळे आयोगाच्या सदस्यांचा अवमान झाला. याची गंभीर दखल घेत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.