या प्रकरणी नक्षत्र मंगल कार्यालयाच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी बाजीराव भगवान सानप यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासनाने काही नियम लागू केले आहेत. परंतु, त्याची अंमलबजावणी न करता सर्रास नियमांची पायमल्ली होत आहे. प्रशासनाने लग्न समारंभात ५० नागरिकांना परवानगी दिलेली आहे. असे असतानाही आळंदीतील वडगाव रस्त्यावरील नक्षत्र मंगल कार्यालयात झालेल्या एका लग्न समारंभात ८० जण आल्याचे दिसून आले. वऱ्हाडी मंडळींनी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला नाही. याशिवाय अनेकांच्या तोंडाना मास्कदेखील नव्हते, असे पोलीस फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
--
चौकट : आळंदीमध्ये दररोज अनेक विवाह पार पडत असून संबंधित मंगल कार्यालय काेरोना महामारी संबंधी नियमांचे पालन करत नसेल तर आळंदी पोलीस ठाण्याशी नागरिकांनी संपर्क करावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी नागरिकांना केले आहे.