‘समृद्ध जीवन’सह मोतेवारांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: November 1, 2015 02:37 IST2015-11-01T02:37:38+5:302015-11-01T02:37:38+5:30
सेबीने निर्बंध लादल्यानंतरही लोकांकडून गुंतवणूक स्वीकारल्याप्रकरणी समृद्ध जीवन फूड्स कंपनीसह महेश किसन मोतेवार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘समृद्ध जीवन’सह मोतेवारांविरुद्ध गुन्हा
पुणे : सेबीने निर्बंध लादल्यानंतरही लोकांकडून गुंतवणूक स्वीकारल्याप्रकरणी समृद्ध जीवन फूड्स कंपनीसह महेश
किसन मोतेवार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेबीने शनिवारी सायंकाळी या संदर्भात डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद
दाखल केली असून, या गुन्ह्यात
त्यांच्या सहकाऱ्यांनाही आरोपी करण्यात आले आहे.
महेश किसन मोतेवार, वैशाली मोतेवार, घनश्याम पटेल आणि राजेंद्र भंडारे यांच्यासह समृद्ध जीवन फूड्स कंपनीविरुद्ध भादंवि ४२०, १८८, १२० ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सेबीचे सहायक महाव्यवस्थापक सचिन ए. सोनवणे (रा. सेबी भवन, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ आॅक्टोबर २०१३ रोजी सेबीने कंपनीला गुंतवणूक न घेण्याबाबत नोटीस बजावली होती. कंपनीमार्फत ‘कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीम’द्वारे लोकांकडून आर्थिक गुंतवणूक तसेच ठेवी घेण्यात येत होत्या़
अशा प्रकारची गुंतवणूक घेण्यासाठी सेबीची परवानगी आवश्यक असते. ही परवानगी समृद्ध जीवनने घेतलेली नव्हती. त्यामुळे गुंतवणूक थांबविण्याचे आदेश सेबीने दिले होते.
परंतु, तरीही कंपनीने गुंतवणूक घेणे सुरूच ठेवले होते. त्यामुळे सेबीने कंपनीची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान कंपनीचे आॅडिट बुक, अकाऊंट बुक ताब्यात घेतले होते. त्यात सेबीने बजावलेल्या आदेशाचे उल्लंघन करून लोकांकडून गुंतवणूक घेणे कंपनीने सुरूच ठेवल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे सेबीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचे प्रमुख महेश मोतेवार यांनाच या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
(प्रतिनिधी)
सेबीने डेक्कन पोलिसांकडे समृद्ध जीवन फूड्स आणि महेश मोतेवार यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेबीने दिलेल्या कागदपत्रांवरून या गुन्ह्याचा तपास सुरु करण्यात आला आहे.
- प्रवीण चौगुले, वरिष्ठ निरीक्षक, डेक्कन पोलीस ठाणे