आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:11 IST2021-05-14T04:11:08+5:302021-05-14T04:11:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीतील आमदार अण्णा बनसोडे यांच्या दिशेने गोळीबार झाल्याच्या प्रकरणाने वळण घेतले ...

आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलावर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीतील आमदार अण्णा बनसोडे यांच्या दिशेने गोळीबार झाल्याच्या प्रकरणाने वळण घेतले आहे. अपहरण करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आमदार बनसोडे यांच्या मुलाच्या विरोधात निगडी व पिंपरी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात परस्परविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सिद्धार्थ अण्णा बनसोडे, सावंतकुमार, लांडगे, सोन्या, साजिद, सुलतान (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) तसेच इतर १० ते १५ इसम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तानाजी भगवान पवार (वय ३९, रा. मोशी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. १३) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: आमदार बनसोडे आणि फिर्यादी यांचे फोनवरून संभाषण झाले. त्या वेळी फिर्यादी हे आमदारांना उलटे बोलले, असा आरोपींचा समज झाला. फिर्यादी हे बुधवारी (दि. १२) सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या आकुर्डी येथील कार्यालयात असताना आमदार अण्णा बनसोडे यांच्या दोन साथीदारांनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांचे अपहरण करून काळभोरनगर, चिंचवड येथे नेले. तेथे आमदार बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याच्यासह इतर आरोपींनी फिर्यादीला मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच सिद्धार्थ बनसोडे याने लोखंडी चॉपरने डोक्यात मारून जिवे ठार माण्याचा प्रयत्न केला.
दुसऱ्या प्रकरणात स्वाती सचिन कदम (वय ३९, रा. गंगानगर, फुरसुंगी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. १२) फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिद्धार्थ बनसोडे, बनसोडे यांचे पीए व इतर आठ इसम (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: फिर्यादी या एजी एनव्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लि. या कंपनीत नोकरीला आहेत. कंपनीच्या आकुर्डी येथील कार्यालयात मंगळवारी (दि. ११) आरोपी आले. त्यांनी धनराज बोडसे व अमोल कुचेकर यांना मारहाण केली. कंपनीचे आयटी एक्झिक्युटीव विनोद रेड्डी यांना डोक्यावर लोखंडी टॉमीसारख्या शस्त्राने मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच कामगार गोकर्ण चव्हाण यांना ढकलून जखमी केले. त्यानंतर ऑफिस बंद करण्यास सांगून फिर्यादी व तानाजी पवार यांना शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन निघून गेले.
गोळीबारप्रकरणी अखेर गुन्हा दाखल
राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या दिशेने गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळभोरनगर, चिंचवड येथे बुधवारी ही घटना घडली. सावनकुमार रमेश सलादल्लू (वय ४८, रा. चिंचवड) यांनी गुरुवारी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तानाजी भगवान पवार (वय ३९, रा. मोशी प्राधिकरण, मूळ रा. उंबरडे, पो. गुरसाळे, ता. खटाव), संकेत शशिकांत जगताप व श्रीनिवास बिरादार (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आमदार बनसोडे यांच्या कार्यालय परिसरातून पिस्तुलाच्या गोळीच्या दोन पुंगळ्या पोलिसांना मिळून आल्या आहेत. या प्रकरणात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात येऊन आमदारपुत्राचा आरोपींमध्ये समावेश असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.