पुण्यातील वैशाली हॉटेलच्या जगन्नाथ शेट्टींविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: April 15, 2017 01:44 IST2017-04-15T01:44:20+5:302017-04-15T01:44:20+5:30
फर्ग्युसन महाविद्यालय मार्गावरील प्रसिद्ध वैशाली आणि रूपाली हॉटेलचे चालक जगन्नाथ शेट्टी यांच्याविरूद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

पुण्यातील वैशाली हॉटेलच्या जगन्नाथ शेट्टींविरुद्ध गुन्हा
पुणे : फर्ग्युसन महाविद्यालय मार्गावरील प्रसिद्ध वैशाली आणि रूपाली हॉटेलचे चालक जगन्नाथ शेट्टी यांच्याविरूद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हॉटेलच्या परवान्यात फेरफार करून फसवणूक केल्याचा आरोप शेट्टी यांच्या मेहुणीने केला होता.
शशिकला श्रीराम शेट्टी यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, १९४५ ते १९५० या कालावधीत वडील श्रीधर शेट्टी यांनी निर्मल भवन, मद्रास कॅफे (रूपाली), मद्रास हेल्थ होम (वैशाली) ही तीन हॉटेल सुरू केली. सात वर्षांची असताना वडिलांचे आकस्मिक निधन झाले. त्यावेळी आत्याचा मुलगा जगन्नाथ हा हॉटेलमध्ये कामाला होता. अशिक्षित आईचा जगन्नाथ यांनी गैरफायदा घेतला. गोड बोलून आत्याचा विश्वास संपादन केला. बहीण शकुंतला हिच्याशी त्यांनी विवाह केला. घरात कुणी कर्ती व्यक्ती नसल्याने जगन्नाथ यांनी हॉटेल व्यवसायाची सूत्रे ताब्यात घेतली. त्यांनी त्यांचा मामेभाऊ शशेंद्र याला हॉटेलमध्ये कामाला लावले. मिळणारा नफा आई आणि तीन बहिणींना देण्याचे जगन्नाथ यांनी कबूल केले होते. माझा मुलगा सलील याने हॉटेल रूपालीचा पुढील कारभार पाहाण्यासाठी चर्चा सुरू केली असता शशेंद्र याने अडथळा निर्माण करीत खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. जगन्नाथ यांच्या वडिलांचे नाव बाबू नसतानाही त्यांनी हॉटेल तसेच पोलीस परवान्यावर जे. बी. शेट्टी असा नावात फेरफार केला. शशेंद्र याने हॉटेल रूपालीच्या परवान्यावर स्वत:चे नाव लिहिले. वडिलांनी कष्टाने उभा केलेला व्यवसाय आणि संपत्ती हडपण्याचा प्रयत्न दोघे करीत आहेत. शशेंद्र सुंदर शेट्टी यांच्याविरूद्धही गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)