नगरसेविकेविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: January 28, 2017 01:51 IST2017-01-28T01:51:12+5:302017-01-28T01:51:12+5:30
महापालिका निवडणुकीमध्ये कुणबी असल्याचे बनावट जात प्रमाणपत्र सादर करून निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याप्रकरणात

नगरसेविकेविरुद्ध गुन्हा
पुणे : महापालिका निवडणुकीमध्ये कुणबी असल्याचे बनावट जात प्रमाणपत्र सादर करून निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याप्रकरणात भाजपाच्या नगरसेविका वर्षा तापकीर यांच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल पाच वर्षांनंतर न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी किरण पांडुरंग परदेशी (वय ४८, रा. सागरदर्शन सोसायटी, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. नगरसेविका वर्षा विलास तापकीर (रा. धनकवडी) यांनी २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक ६९ मधून निवडणूक लढवली होती. त्या वेळी परदेशी त्यांच्याविरुद्ध उभ्या होत्या. तापकीर या मराठा आहेत. मात्र, त्यांनी कुणबी असल्याचे प्रमाणपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले होते. या निवडणुकीमध्ये तापकीर जिंकल्या होत्या.
त्यांनी बनावट प्रमाणपत्र दिल्याची तक्रार परदेशी यांनी केली होती. खोटे प्रमाणपत्र देऊन माझी तसेच आयोगाची फसवणूक केल्याचे परदेशी यांनी फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. याप्रकरणी मागील शुक्रवारी तापकीर यांच्याविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.