सर्जनशीलता स्त्रीची शक्ती
By Admin | Updated: October 13, 2015 01:28 IST2015-10-13T01:28:41+5:302015-10-13T01:28:41+5:30
सर्जनशीलता ही स्त्रीची शक्ती आहे. महिलांकडे जास्त क्षमता असते, त्या ती योग्यरीतीने वापरतातही; मात्र त्यासाठी त्यांना कुटुंबाकडून आणि समाजाकडून योग्यरीतीने मानसिक बळ मिळणे आवश्यक असते

सर्जनशीलता स्त्रीची शक्ती
पुणे : सर्जनशीलता ही स्त्रीची शक्ती आहे. महिलांकडे जास्त क्षमता असते, त्या ती योग्यरीतीने वापरतातही; मात्र त्यासाठी त्यांना कुटुंबाकडून आणि समाजाकडून योग्यरीतीने मानसिक बळ मिळणे आवश्यक असते, असे मत वैद्यकीय क्षेत्रातील महिलांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर व्यक्त केले.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘स्त्रीशक्तीचा जागर’ या संकल्पनेअंतर्गत डॉक्टर
महिलांनी ‘लोकमत’ला भेट दिली.
या वेळी वैद्यकीय क्षेत्रातील आव्हानांचा वेध घेण्यता आला. महिला म्हणून या क्षेत्रात स्थान निर्माण करत असताना त्यांच्यापुढे असणारी आव्हाने आणि त्याचा सामना करताना त्यांची होणारी ओढाताण याविषयी डॉक्टरांनी आपले अनुभव या वेळी मांडले.
डॉ. स्वाती भावे म्हणाल्या, लहानपणापासूनच मुलींना मुलांसारखी वागणूक देणे चुकीचे आहे. समानता असली तरीही मुलीला काही गोष्टी येणे भाग आहे. ही मानसिकता बदलत असल्याने अनेक समस्या उद्भवतात. पालकांनी चांगले संस्कार केल्यास मुलगी ही उत्तम गृहिणी आणि त्यानंतर एखाद्या करिअरमध्ये स्वत:चे नाव कमवू शकते हे विसरता कामा नये.
पुरुष घरातील कामात मदत करतात; परंतु त्यांंची जबाबदारी घेण्याची तयारी नसते. हे चित्र बदलल्यास महिला स्वत:ला जास्त चांगल्या पद्धतीने सिद्ध करूशकतील. स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने पुढे जात असल्या तरीही मानसिकरीत्या स्त्रिया आजही खंबीर नाहीत. त्यामुळे त्यांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे समतोल राखत महिलेने काम करण्याची आवश्यकता आहे.
- डॉ. हिमानी कुलकर्णी
मानसोपचारतज्ज्ञ
१९७०च्या दरम्यान पदवी घेऊन बाहेर पडले असताना रुग्ण महिलांची परिस्थिती गंभीर असायची. आता वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिकतेमुळे यात बऱ्याच प्रमाणात सुधारणा झाली आहे. असे असले तरी महिला स्वत:च्या आरोग्याकडे अजिबातच लक्ष देत नाहीत, ही वस्तुस्थिती आजही आहे. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक महिला आजच्या आधुनिक काळातही स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकत नाहीत, ही शोकांतिका आहे. असे होण्यामागे एका दृष्टिकोनातून महिलाच जबाबदार आहे.
- डॉ. सविता मेहेंदळे, स्त्रीरोगतज्ज्ञ
आपल्या समाजात आजही मोठ्या प्रमाणात लिंगभेद असल्याचे चित्र आहे. एखाद्या संघटनेच्या पदाधिकारी पदावर जाण्यासाठी महिलेला मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागते. तसेच पदावर गेल्यावरही पुरुषांच्या अहंकाराचा सामना करावा लागतो. महिला कुटुंब संभाळत असताना पदावर काम करू शकणार नाही असाच अनेकदा दृष्टिकोन असतो. मात्र महिलांनी स्वत:च्या क्षमतांवर ठाम राहात आत्मविश्वासाने हा लढा द्यायला हवा.
- डॉ. स्वाती भावे
बालरोगतज्ज्ञ