मायेच्या पाझराला करावी लागतेय प्रतीक्षा
By Admin | Updated: July 14, 2014 04:49 IST2014-07-14T04:49:36+5:302014-07-14T04:49:36+5:30
मुलं वाढविण्याची संकल्पनाच इतकी सुखद, की स्वत:चे मूल नसले तरी दत्तक घेण्याची दांपत्यांची तयारी असते.

मायेच्या पाझराला करावी लागतेय प्रतीक्षा
हिनाकौसर खान-पिंजार, पुणे
मुलं वाढविण्याची संकल्पनाच इतकी सुखद, की स्वत:चे मूल नसले तरी दत्तक घेण्याची दांपत्यांची तयारी असते. मात्र, अनाथालयांमधील मुलांची संख्याच कमी होऊ लागली आहे, त्यामुळे जैवशास्त्रीय किंवा वैद्यकीयदृष्ट्या अडचणी असल्याने पालकत्वाचा अनुभव घेण्यात असमर्थ दांपत्यांच्या मायेच्या पाझराला प्रतीक्षा करावी लागत आहे.
सध्याच्या काळात करियरमुळेही दांपत्य आपला पाळणा लांबवतात. उशिरा लग्नानंतरही जोडीदाराला समजून घेणे, मौज करणे या कारणांमुळे कुटुंब नियोजनाचा कालखंड लांबवतात. शिवाय सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यातील ताण-तणाव, प्रदूषण, जीवनशैली याचाही परिणाम शरीरावर होत राहतो व त्यातूनही सुदृढ बाळ जन्माला घालण्याची आईची क्षमता किंवा वंध्यत्व अशा समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. पूर्वी मूल न होणं हा सामाजिक द्वेषाचा विषय होता. शारीरिक अडचणींना समजून न घेऊन या गोष्टीचा बाऊ केला जाई आणि त्यातूनच अशा जोडप्यांना अवहेलना सोसावी लागायची. मात्र, पालकत्वाचा अनुभव घेण्याची इच्छा प्रत्येकालाच असली तरी काही वेळा शारीरिक पातळीवर तसेच जैवशास्त्रीय व वैद्यकीयदृष्ट्या काही अडचणी स्वीकारण्याशिवाय पर्याय नसतो. सध्या वंध्यत्व निराकरणासाठी नवे तंत्रज्ञानही विकसित झाले आहे. फ्रोझन स्पर्म, टेस्ट ट्यूब बेबी, सरोगसी असे पर्याय असले तरी ते महागडे आणि खात्रीशीर पर्याय नसतात, त्यामुळे आपोआपच पालक दत्तक स्वीकृतीकडे वळत आहेत.
याबाबत ‘सोफोश’च्या संचालिका माधुरी अभ्यंकर म्हणाल्या, ‘वाढत्या वयामुळे आईपणाला अडचणी येत आहेत, त्यामुळे पालक मूल दत्तक घेऊन दोहोंच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र, अनाथालयात आता मुले दाखल होण्याचे प्रमाणच घटले आहे. मुख्यत्वेकरून वैद्यकीय सेवा, एमटीपी, आय पील अशा सुविधा गावागावांत पोहोचल्याने मूल जन्माला घालून सोडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. लग्नाला ३ ते ५ वर्षे झालेली जोडपी दत्तक घेण्यासाठी येतात. अगदी चाळिशीला पोहोचलेली जोडपी येतात. सध्या सोफोश संस्थेत ७३ पालक दीड ते दोन वर्षांच्या काळासाठी वेटिंगवर आहेत.’