नाल्यात साठला कचरा
By Admin | Updated: October 13, 2015 01:21 IST2015-10-13T01:21:13+5:302015-10-13T01:21:13+5:30
शिवाजी पुतळा चौक, मुस्लिम दफनभूमीलगत असलेल्या नाल्यात तसेच खालची आळी ते होले मळा येथून गेलेल्या नाल्यात मोठ्या प्रमाणात बांधकामाचा राडारोडा व कचरा साठल्याने दुर्गंधी निर्माण झाली आहे

नाल्यात साठला कचरा
हडपसर : शिवाजी पुतळा चौक, मुस्लिम दफनभूमीलगत असलेल्या नाल्यात तसेच खालची आळी ते होले मळा येथून गेलेल्या नाल्यात मोठ्या प्रमाणात बांधकामाचा राडारोडा व कचरा साठल्याने दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र तरीही महापालिका व कँटोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
जांभुळकर चौक, जगताप चौक, फातिमानगर परिसरातील काही फळे, भाजीविक्रेते तसेच हॉटेल व्यावसायिक रात्री-अपरात्री शिवाजी पुतळा तसेच दफनभूमीलगतच्या पुलावरून शिळे व खराब अन्न नाल्यात फेकतात. त्यामुळे राडारोड्यात भर पडून मोकाट जनावरांचे तसेच डुकरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दुर्गंधीही पसरल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या एक महिन्यापासून परिस्थिती कायम असल्याने येथील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या ठिकाणी ट्रकमधून काही दिवस काळी माती, बांधकामाचा राडारोडा पुलावर आणून टाकला. टाकलेला राडारोडा अद्याप तसाच आहे. मात्र राडारोडा कोणी टाकला, याबाबत कँटोन्मेंट व महापालिकेकडून विचारणा होण्याऐवजी जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. गेल्या महिन्याभरात येथे ठिकठिकाणी राडारोड्याचे कृत्रिम डोंगरच उभारले गेले आहेत. कँटोन्मेंट व पालिकेच्या हद्दीचे विभाजन या नाल्यामुळे होत असल्यामुळे राडारोड्याची कारवाई नक्की कोण करणार, हा प्रश्नच आहे. याबाबत कँटोन्मेंट आरोग्याधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. (वार्ताहर)